PCMC: कर्मचाऱ्याला नोटीस दिल्याने महापालिका अधिकाऱ्याला मारहाण, तिघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 09:21 AM2023-12-06T09:21:46+5:302023-12-06T09:22:18+5:30
दुपारी बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली...
पिंपरी : कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तन केल्याबाबत त्याला नोटीस दिली. याचा राग मनात धरून सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भोसरी येथील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात मंगळवारी (दि. ५) दुपारी बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
राजेश नंदलाल भाट (५४, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शंकर मुरलीधर सोनवणे (३२, रा. बोपखेल गावठाण), संतोष लांडगे (४५) यांच्यासह एक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संतोष लांडगे हे भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे यांचे पती आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश भाट हे पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शंकर सोनवणे यास विनापरवाना गैरहजर आणि उद्धट वर्तनाबाबत नोटीस बजावली होती. त्याचा राग मना धरून त्याने इतर साथीदारांना घेऊन येत राजेश भाट यांना शिवीगाळ केली. मारहाण करण्यासाठी अंगावर धावून आले. अनोळखी व्यक्तीने भाट यांच्या कानशिलात लगावली.
भाट यांना मारहाण करत त्यांच्या कार्यालयात ओढून नेले. तुझ्या नावाने आत्महत्या करून तुझी नोकरी घालवतो, अशी धमकी शंकर सोनवणे याने दिली. फिर्यादी भाट हे शासकीय काम करत असताना त्यांना अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद आहे.