PCMC | बाप रे बाप! एका व्हिडीओसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोजले सव्वा लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 03:17 PM2023-04-06T15:17:44+5:302023-04-06T15:20:50+5:30
जनजागृतीसाठी लाखो रुपयांचा चुराडा महापालिका करत असल्याचे समोर आले आहे...
- प्रकाश गायकर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छाग्रह ही मोहीम राबविण्यात आली. त्याच्या जनजागृतीसाठी रेडिओवर जिंगल्स वाजवण्यात आल्या. यासाठी तब्बल १३ लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे. तर अवघा एक व्हिडीओ बनविण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांचे बिल महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने मंजूर केले आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी लाखो रुपयांचा चुराडा महापालिका करत असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या वतीने गेल्यावर्षी मोठा गाजावाजा करत स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामास सुरुवात करण्यात आली. स्पर्धेमध्ये पहिल्या तीन शहरांमध्ये येण्याचा चंग तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी बांधला होता. त्यासाठी रंगरंगोटी, पोस्टर आदी अनेक प्रकारांनी नागरिकांची जनजागृती केली. स्वच्छ सर्वेक्षणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही शहर १९ व्या क्रमांकावर फेकले गेले. मात्र, यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. रेडिओवर जिंगल्स वाजवण्यासाठी तब्बल १३ लाख रुपये खर्च झाला. रेडिओच्या चार वाहिन्यांवर याबाबत १ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत जनजागृती केली. त्यासाठीच्या १३ लाख रुपये खर्चास स्थायी समितीमध्ये आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
पर्यावरण दिनानिमित्त नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली. त्यासाठी एक व्हिडीओ पर्यावरण विभागाने तयार केला. त्यासाठी निविदा न काढता अल्प मुदतीची कोटेशन नोटीस काढण्यात आली. त्यामध्ये मे. एसएसडब्ल्यू क्रिएशन यांनी १ लाख २० हजार ५०० रुपये दर सादर केला. त्यांच्याकडून एक व्हिडीओ बनवून घेण्यासाठी तब्बल १ लाख २० हजार रुपये मोजण्यात आले. जनजागृतीसाठी तयार करण्यात येणाऱ्या जिंगल्स, व्हिडीओ यावर महापालिका लाखो रुपयांचा खर्च करत आहे.