PCMC: पालखी सोहळ्यासाठी सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात; महापालिका सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 01:37 PM2024-06-21T13:37:02+5:302024-06-21T13:37:33+5:30

जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळाची तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, विसाव्याचे ठिकाण तसेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाच्या ठिकाणाची पाहणी महिवाल यांनी केली....

PCMC: Preparation of facilities for palanquin ceremony in final stage; Municipality ready | PCMC: पालखी सोहळ्यासाठी सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात; महापालिका सज्ज

PCMC: पालखी सोहळ्यासाठी सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात; महापालिका सज्ज

पिंपरी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज असून, पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल महिवाल यांनी दिली.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळाची तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, विसाव्याचे ठिकाण तसेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाच्या ठिकाणाची पाहणी महिवाल यांनी केली.

या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, सहशहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, बाबासाहेब गलबले, उपायुक्त रविकिरण घोडके, मनोज लोणकर, संदीप खोत, अण्णा बोदडे, नीलेश भदाणे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सीताराम बहुरे, उमेश ढाकणे, राजेश आगळे, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, यशवंत डांगे आदी उपस्थित होते.

मुक्कामासह विसावा ठिकाणांची केली पाहणी

निगडी येथील भक्ती-शक्ती परिसरात महापालिकेच्या वतीने स्वागतकक्ष उभारला जातो. तेथे करण्यात येणाऱ्या व्यवस्थेबद्दलची माहिती पाहणीदरम्यान महिवाल यांनी घेतली. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम असतो. आकुर्डी येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक विद्यालय येथे दिंड्यांचा मुक्काम असतो. या शाळांमध्ये करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेत खराळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नाशिक फाटा रोड, दापोडी येथील पालखी विसावा आदी ठिकाणीही आयुक्त महिवाल यांनी पाहणी केली.

स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक

१. पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सर्व होर्डिंग्जची पाहणी करून योग्य कार्यवाही करण्यात येत आहे, विविध ठिकाणी दिशादर्शक फलक दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूकदेखील करण्यात आली आहे.

२. पिण्याचे पाणी, तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी महापालिकेच्या वतीने रुग्णवाहिका तसेच पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे.

सीसीटीव्हीसह ड्रोनचीही नजर

पालखी मार्गावर तसेच मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकीन बर्निंग मशीन ठेवण्यात येणार आहेत. तसेच पालखी सोहळा कालावधीत वारकऱ्यांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांत मोफत वैद्यकीय सुविधा २४ तास उपलब्ध करून देण्यात येणार असून फिरता दवाखानाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पालखी मुक्काम, विसावा, स्वागत कक्ष आणि पालखी मार्गावर योग्य त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

Web Title: PCMC: Preparation of facilities for palanquin ceremony in final stage; Municipality ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.