PCMC: आधार कार्ड नाही तर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाही; पालिकेच्या शिक्षण विभागाचा तोंडी फतवा
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: January 8, 2024 04:10 PM2024-01-08T16:10:35+5:302024-01-08T16:12:02+5:30
राज्यातील सर्व शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक शिक्षण विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येतात....
पिंपरी : शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडे आधारकार्ड असणे अत्यावश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसेल, त्यांची नावे शाळेच्या पटावरून कमी करण्यात यावी आणि त्यांना शाळेतून काढावे, अशा तोंडी सूचना शिक्षण विभागाने शिक्षकांना दिल्या आहेत. आधारकार्ड नसेल तर शिक्षण नाही; अशी भूमिका शिक्षण विभाग घेत असून यामध्ये शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल, असा तोंडी आदेशच दिला असल्याने महापालिका शाळेत आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना बसू दिले जात नसल्याची भुमिका शिक्षक घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक शिक्षण विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येतात. विद्यार्थ्यांचे हे आधारक्रमांक देण्यासाठी विभागाकडून शाळांना मागील वर्षभरापासून आग्रह करण्यात येतो आहे. अनेक पालकांनी व पालक संघटनांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत स्वत:हून कॅम्प राबवत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बनवून घेतले. मात्र, शाळांनी सातत्याने पाठपुरावा करूनही अनेक पालकांनी आपल्या पाल्यांचे आधारकार्ड काढलेले नाही. दुसरीकडे या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सादर न केल्यास शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल, अशा धमक्या शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहेत. या प्रकरणात शिक्षण विभाग शिक्षकांना व पालकांना निष्कारण वेठीस धरत असल्याचा आरोप विविध शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी केला आहे.
बालकांच्या बोटांचे ठसेच मिळत नाहीत...
विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार न होण्याची सर्वाधिक अडचण ही प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना येत आहे. यामध्ये, पहिली किंवा दुसरीच्या अनेक विद्यार्थ्यांच्या बोटांचे ठसेच नोंदविले जात नाहीत. या वस्तुस्थितीवर काहीही उपाय नसल्याने त्यांची आधारकार्डे तयार होत नाहीत. मात्र, हे समजून घेण्यास शिक्षण विभाग तयारच नसल्याची टीका पालकांनी केली आहे. याशिवाय या प्रक्रियेतील पालकांचे अज्ञान, त्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, आधार कार्ड काढण्याबाबत पालकांची उदासीनता, अशा अनेक गोष्टी या मुद्द्याशी निगडीत आहेत.
विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे आहे. मात्र, आधार कार्ड नसेल तर विद्यार्थ्यांना शाळामध्ये बसू देवू नका, असा कोणताही आदेश शिक्षण विभागाने दिला नाही. असा प्रकार घडत असेल तरयाबाबत पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करावी.
- विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त, महापालिका