PCMC: टॅक्स टळणार नाही! साडेसहा महिन्यांत ६०० कोटींची वसुली
By विश्वास मोरे | Published: October 23, 2023 10:23 AM2023-10-23T10:23:56+5:302023-10-23T10:24:23+5:30
या आर्थिक वर्षातील साडेसहा महिन्यात तब्बल २०१ कोटी रुपयांची जुनी थकबाकी वसुली केली आहे. सहाशे कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे...
पिंपरी : पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षांत कर वसुलीचा विक्रम केला आहे. थकीत कर वसूल करण्यात महापालिकेच्या कर संकलन विभागाला यश आले आहे. गेल्या वर्षांत तब्बल साडेतीनशे कोटी, या आर्थिक वर्षातील साडेसहा महिन्यात तब्बल २०१ कोटी रुपयांची जुनी थकबाकी वसुली केली आहे. सहाशे कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
पिंपरी- चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा सहा लाख सात हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. या विभागाच्या वतीने विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ताधारकांना नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाद्वारे जनजागृती, महत्त्वाच्या चौकात होर्डिंग्ज, रील्स स्पर्धा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ता कराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा संदेश पाठवला जात होता. अशा विविध बाबींमुळे साडेसहा महिन्यात कर वसूल करण्यात आला आहे.
आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी तीव्र मोहीम हाती घेण्यात आली असून थकबाकीदार तत्काळ थकीत कर भरत आहेत. साडेसहा महिन्यात कर संकलन व कर आकारणी विभागाला ६५ टक्के मालमत्ताधारकांचा ६०४ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात यश आले आहे. उर्वरित साडेपाच महिन्यात ३५ टक्के करदात्यांचा कर आणि थकीत कर वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
आकडे बोलतात....
गेल्या तीन वर्षांतील थकबाकी वसुलीचा वाढता आलेख
वर्ष थकीत कर वसूल
२०२१-२२. २६९ कोटी
२०२२-२३. ३५४ कोटी
२०२३-२४. २०१ कोटी (साडेसहा महिन्यात)
जप्ती मोहीम आणि सर्वेक्षण यांची निश्चित करून दिलेली लक्ष्ये साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. वर्षानुवर्षे थकीत असलेली रक्कम वसूल करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहे. आतापासूनच जप्ती मोहिमेने वेग घेतलेला असून या आर्थिक वर्षात सर्वाधिक थकबाकी वसूल करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त