PCMC :माजी अध्यक्ष अन् पक्षनेत्यांमध्ये शाब्दिक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:09 AM2018-09-28T01:09:42+5:302018-09-28T01:09:53+5:30
महापालिका सर्वसाधारण सभेसाठी सत्ताधारी भाजपाकडून विषय मंजुरी किंवा नामंजुरीसाठी व्हिप बजावला जातो. दोन विषयांच्या संदर्भात आज व्हिप यावरून माजी स्थायी समिती व सत्तारूढ पक्षनेत्यांमध्ये जुंपली होती.
पिंपरी - महापालिका सर्वसाधारण सभेसाठी सत्ताधारी भाजपाकडून विषय मंजुरी किंवा नामंजुरीसाठी व्हिप बजावला जातो. दोन विषयांच्या संदर्भात आज व्हिप यावरून माजी स्थायी समिती व सत्तारूढ पक्षनेत्यांमध्ये जुंपली होती.
सर्वसाधारण सभेत विषय कोणते मंजूर करावेत किंवा नामंजूर करायचे. कोणते दप्तरी दाखल करायचे, कोणते फेटाळून लावायाचे याविषयी पक्षाचा व्हिप काढला जातो. आजच्या सभेत दोन विषयात व्हिपचा गोंधळ झाला. मंजूर करण्याचा विषय तहकूब आणि तहकूब विषय मंजूर करण्यात आला. यावर बोलताना स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे या महापौर राहुल जाधव आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर चिडल्या होत्या.
आम्हाला ग्रहित धरू नका : सीमा सावळे
महापालिकेच्या मालमत्तांवर सौर यंत्र बसविण्याचा विषय होता. हा विषय चर्चा करून तहकूब ठेवायचा होता. मात्र, तो मंजूर केला. यावर सावळे म्हणाल्या,‘‘सभा कामकाजाविषयी सदस्यांना व्हिप दिला जातो. तो वारंवार बदलणे योग्य नाही. याची कल्पना द्यायला हवी होती. आम्हाला कोणी गृहित धरू नये. मुर्खात काढण्याचा प्रकार आहे. आम्ही काय वेडे आहोत. ही बाब चुकीची आहे. नगरसेवकांना विश्वासात घेऊन धोरण अवलंबले जावे.’’
आयत्यावेळी घुसडले विषय
महापालिकेच्या तहकूब सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपाने आज आयत्यावेळी विषय घुसडले. त्यावर माजी महापौर मंगला कदम यांनी आक्षेप घेतला. कोणत्या नियमाच्या आधारे तहकूब सभेत विषय दाखल करून घेतले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महापालिकेची सप्टेंबर महिन्याची तहकूब सभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.
सप्टेंबरच्या सभेत तातडीची बाब म्हणून पिंपरी विधानसभा मतदार संघातील दुबार मतदार, मृत मतदारांची नावे वगळण्याचा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर महापालिकेतील एका नगरसेवकाची नियुक्ती करण्याचा, असे तीन विषय आयत्यावेळी दाखल केले होते. कुत्र्यांच्या प्रश्नावरून गोंधळ झाल्याने सभा तहकूब झाली होती. तहकूब सभा आज झाली.
विषयपत्रिकेवरील २४ आणि आयत्यावेळी दाखल करून घेतलेल्या दोन अशा २६ विषयांना मान्यता दिली. त्यानंतर आणखीन तीन विषयांना मान्यता देण्यास सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केली. याला माजी महापौर कदम यांनी आक्षेप घेतला. संबंधित विषय आयत्यावेळी घेतले, त्याची नगरसेवकांना माहिती दिली नाही. नगरसेवकांना अंधारात ठेवून विषय मंजूर करणे अत्यंत चुकीचे आहे. तहकूब सभेत विषय कसे दाखल करून घेतले जातात? असा प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या,‘‘सत्ताधारी आणि प्रशासन चुकीच्या पद्धतीने विषय घुसडून मंजूर करून घेतात. ही बाब नियमबाह्य आहे.’’
विकासाला प्राधान्य
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले,‘‘केंद्राकडून काही प्रकल्प राबविण्यात येतात. त्या विषयांची निकड किती आहे. यावरून विषयांचा प्राधान्यक्रम ठरविला जातो. शहराच्या विकासासाठी केंद्राचे काही प्रकल्प असतील तर त्याविषयी प्रशासनाकडून माहिती घेऊन विषयाचे नियोजन केले जाते. यात सदस्यांना माहिती न देण्याचा विषयच येत नाही.’’