पिंपरीत चार लिपिकांवर होणार दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 06:36 PM2019-04-11T18:36:35+5:302019-04-11T18:42:12+5:30
महापालिकेच्या क्रीडा विभागातर्फे जलतरण तलावांवरील कामकाजाची पाहणी करण्यात आली.
पिंपरी : महापालिकेच्या क्रीडा विभागातर्फे जलतरण तलावांवरील कामकाजाची पाहणी करण्यात आली. यात सदोष कामकाज आढळलेल्या तलावांवरील १३ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यांतील काही कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे चार लिपिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या नोटीस त्यांना बजावण्यात आल्या आहेत. तलांवावरील दोन ठेकेदारांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
उन्हाची तीव्रता वाढल्याने जलतरणर तलावांवर पोहणाºयांची गर्दी होत आहे. शाळांना सुटी लागल्याने त्यात विद्यार्थ्यांचीही भर पडत आहे. याचा फायदा घेत काही तलावांवर लिपिक, जीवरक्षक आणि सुरक्षारक्षक यांच्याकडून संगनमताने तिकिटांच्या माध्यमातून गैरप्रकार करीत असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. त्यामुळे महापालिकेच्या क्रीडा विभागातर्फे भरारी पथकांच्या माध्यमातून जलतरण तलावांवरील कामकाजाची पाहणी करण्यात आली. क्रीडा विभागाच्या सहायक आयुक्त आशा राऊत यांनी पर्यवेक्षकांचे भरारी पथक नेमून त्यांना तलावांवर अचानक पाहणी करण्याची सूचना केली. राऊत यांनीही पाहणी केली. काही तलावांवर तिकिटांपेक्षा जास्त लोक पोहण्यासाठी सोडण्यात आले होते. काही ठिकाणी जीवरक्षक गणवेशात नव्हते. तर काही तलावांवर तारीख वेळ नमूद न करता आणि शिक्के नसलेली तिकिटे देण्यात आल्याचे भरारी पथकांना पाहणी दरम्यान आढळून आले.
स्थापत्य, विद्युतविषयक कामे करण्याची गरज
भरारी पथकांच्या पाहणी दरम्यान काही तलावांवर स्नानगृहातील शॉवर तुटले असल्याचे आढळले. तसेच विद्युतविषयक आणि स्थापत्यविषयक कामे करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले. अशा कामांबाबत स्थापत्य आणि विद्युत विभागाच्या अभियंत्यांना पत्र देण्यात आले आहे. संबंधित कामे त्वरित करून तलाव अधिक सुरक्षित करून नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असे आशा राऊत यांनी सांगितले.
नियमांचे पालन व्हावे
जलतरण तलावांवर काही कर्मचारी गैरप्रकार करतात. अशा प्रकारांना आळा बसविण्यासाठी सातत्याने अचानक पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कायमस्वरुपी भरारी पथके नेमण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांनी आणि तलावांवर येणाऱ्या नागरिकांनीही नियमांचे पालन करावे, असे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.
थेरगावच्या तलावासाठी नाही पुरेसे मनुष्यबळ
शहरात महापालिकेचे १३ जलतरण तलाव आहेत. यात महापापिका आयुक्तांच्या बंगल्यात एक तलाव आहे. तो नागरिकांसाठी खुला नाही. उर्वरित १२ तलाव नागरिकांसाठी खुले आहेत. यातील थेरगाव येथील तलाव दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे. त्याची दुरुस्ती झाली असून, तो खुला होण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे. मात्र क्रीडा विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने हा तलाव खुला करण्यात अडथळे येत असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच हा तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, असे क्रीडा विभागातर्फे सांगण्यात येत आहे.
तलावांवर कामकाज व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आल्याने दोन ठेकेदारांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, अशा आशयाच्या नोटीस चार लिपिकांना बजावण्यात आल्या आहेत.
- आशा राऊत, सहायक आयुक्त, क्रीडा विभाग, महापालिका