No Entry तून वाहन चालविल्याने पाच लाखांचा दंड; पिंपरीत दोन दिवसात ८८७ जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 10:32 AM2023-01-23T10:32:44+5:302023-01-23T10:33:11+5:30
वाहतुकीला शिस्त लावण्याच्या तसेच अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने पोलिसांची विशेष मोहीम
पिंपरी : बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईसाठी पिंपरी - चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. यात विरूद्ध दिशेने तसेच ‘नो एंट्री’मधून वाहन चालविल्याप्रकरणी मोठी कारवाई केली. शहरातील १४ वाहतूक विभागांमध्ये राबविलेल्या या मोहिमेत शुक्रवार (दि. २०) आणि शनिवार (दि. २१) या दोन दिवसात ८८७ जणांवर कारवाई करून ४ लाख ९६ हजारांचा दंड आकारला.
पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत वाहतुकीला शिस्त लावण्याच्या तसेच अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने ही मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. विरूद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी थेट खटले दाखल करून प्रकरणे न्यायालयात सादर केली. विरूद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
विरूद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी हिंजवडी, देहूरोड, बावधन वाहतूक विभागात एकही कारवाई झाली नाही. भोसरी आणि सांगवी वाहतूक विभागात सर्वाधिक कारवाई झाली. ‘नो एंट्री’मधून वाहन चालविल्याप्रकरणी सांगवी आणि वाकड विभागात सर्वाधिक कारवाई झाली.
नियमांचे उल्लंघन
विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता निर्माण होते. तसेच वाहतूककोंडी होते. त्यामुळे वादही होतात. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
वाहतूक नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अपघात रोखण्यासाठी वाहतुकीला शिस्त आवश्यक आहे. त्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. विशेष मोहीम राबवली जात असून, दंडात्मक कारवाई केली जात आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. - सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा
पिंपरी - चिंचवड वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई
- राँग साईड खटले - १०६
- नो एंट्री कारवाई - ७८१
- नो एंट्रीप्रकरणी दंड - ४ लाख ९६ हजार