रखडलेले वेतन करार मार्गी लागणार
By admin | Published: October 30, 2016 02:50 AM2016-10-30T02:50:16+5:302016-10-30T02:50:16+5:30
टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदाची धुरा रतन टाटा यांनी हंगामी स्वरूपात हाती घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील टाटा मोटर्स कंपनीतील कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण
पिंपरी : टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदाची धुरा रतन टाटा यांनी हंगामी स्वरूपात हाती घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील टाटा मोटर्स कंपनीतील कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या वेतनवाढीचा करार मार्गी लागण्याची भावना कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे.
टाटा मोटर्स उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटविल्यानंतर संचालक रतन टाटा यांनी स्वत:च सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य, निर्णयक्षमता, तसेच दूरदृष्टीचे धोरण आणि कामगारांबद्दल आपुलकीची भावना याबद्दलचा कामगारांना अनुभव आहे. कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या, व्यवस्थापनाकडून वेळीच न होणारे निर्णय यांमुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. परंतु, अचानक घडून आलेल्या या बदलामुळे कामगांराचे प्रश्न सुटतील. त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार होईल, अशी आशा कामगारांना वाटत आहे.
गेल्या १४ महिन्यांपासून पिंपरीतील टाटा मोटर्स कंपनीत कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात वेतनवाढीच्या मुद्द्यावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, अद्याप निर्णय होऊ शकला नाही. कामगारांनी कंपनी कॅन्टीनच्या जेवणावर बहिष्कार टाकला. विविध मार्गांचा अवलंब करून नाराजी व्यक्त केली. राजकीय नेत्यांच्या माध्यमातून कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा घडवून आणून कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. अशातच झालेला नेतृत्वबदल कामगारांच्या दृष्टीने आशादायी ठरला आहे. संचालक रतन टाटा यांच्याकडे सूत्र आल्यामुळे कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर मार्ग निघेल, अशी अपेक्षा कामगार संघटनांनी व्यक्त केली.
टाटा मोटर्स उद्योग समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा रतन टाटा यांनी स्वीकारली. कामगारांची, कामगार प्रश्नांची जाण असलेली व्यक्ती अशी कामगारांच्या मनात त्यांच्याबद्दल भावना आहे. त्यांनी सूत्रे हाती घेतल्यामुळे देव माणसाच्या
हाती कारभार आल्यामुळे कामगारांच्या प्रश्नांची चिंता संपून जाईल, असे टाटा मोटर्स एम्पालॉईज युनियनचे अध्यक्ष समीर धुमाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
लघुउद्योजकांकडून निर्णयाचे स्वागत...
कंपनीतील प्रत्येक कामगाराला परिवारातील सदस्य या स्वरूपाची वागणूक देणाऱ्या व्यक्तीकडे ऐन दिवाळीत उद्योगसमूहाची धुरा आली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील कंपनीच्या कामगारांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे, अशा भावना टाटा मोटर्समधील कामगारांनी व्यक्त केल्या आहेत. टाटा उद्योगसमूहावर अवलंबून असणाऱ्या छोट्या-मोठ्या उद्योजकांनीही या बदलाचे स्वागत केले आहे.