सामान्यांना उन्हासह महागाईचाही तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 01:04 AM2018-03-03T01:04:19+5:302018-03-03T01:04:19+5:30

प्रखर उन्हासह सर्वसामान्यांना महागाईचाही तडाखा सहन करावा लागत आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंच्या झालेल्या भाववाढीमुळे महागाईत वाढ होत आहे.

People also hit inflation with sunshine | सामान्यांना उन्हासह महागाईचाही तडाखा

सामान्यांना उन्हासह महागाईचाही तडाखा

Next

रहाटणी : प्रखर उन्हासह सर्वसामान्यांना महागाईचाही तडाखा सहन करावा लागत आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंच्या झालेल्या भाववाढीमुळे महागाईत वाढ होत आहे. डिझेल, पेट्रोलसह, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचे दररोज वाढणारे दर पाहता सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर, चाकरमाने दिवसभर घाम गाळतो, तर गृहिणींच्या डोळ्यांत महागाईने अश्रू तरळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
सध्या सणासुदीचे व लग्नसराईचे दिवस आहेत. शाळा व कॉलेजच्या परीक्षांचा हा काळ आहे. शाळांना सुटी लागताच काही दिवस नातेवाइकांकडे जाण्याचा बेतही काही जण आखतात. परंतु वाढत्या महागाईमुळे एखादा पाहुणा घरी आला तर ‘दुष्काळात तेरावा महिना’, अशी सर्वसामान्यांची अवस्था होत आहे.
राज्यात व केंद्रात शासन बदलले. सत्ता परिवर्तन झाल्याने अच्छे दिन येणार म्हणून देशवासी प्रतीक्षेत आहेत. परंतु देशात वाढती बेरोजगारी अत्यल्प वेतनावर सेवा करणारे उच्च शिक्षित तरुण पाहता त्यांच्या शिक्षणाचे अवमूल्यन होत असल्याची व्यथा व्यक्त केली जात आहे. अशिक्षित व शेतात किंवा बांधकामावर काम करणारे ५ ते १0 हजार कमावतात. मात्र उच्चशिक्षितांना याहून कमी वेतन असल्याने या मिळकतीत घर कसे चालवावे हा प्रश्न आहे.
जीवनावश्यक वस्तूंपासून भाजीपाल्यापर्यंत साºयांचेच भाव आकाशाला भिडले आहेत. वाढते ऊन, बेमोसमी पाऊस, पर्यावरणातील सातत्याने होणारा बदल यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या आजारांचे वाढणारे प्रस्थ व औषधांच्या वाढलेल्या किमती सर्वसामान्य माणसाला जीवन जगणे नकोसे करीत आहे. यातच महागाईत भर पडत असल्याने जीवनावश्यक गरजा कशा पूर्ण कराव्यात, हा प्रश्न आहे. शासनकर्त्यांनी वाढते जीवनाश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात ठेवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे.
केंद्र शासनाच्या निर्णयानुसार इंधनाचे भाव दररोज बदलण्याची मुभा इंधन उत्पादन कंपन्यांना देण्यात आल्या़ मात्र इंधनाचे भाव वाढतच गेले. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे़ मात्र एकदाही दरवाढ रोखून दरांमध्ये कपात करून सर्वसान्य माणसाला दिलासा देण्याचे काम शासनाने किंवा इंधन उत्पादक कंपन्यांनी केले नाही. त्यामुळे ‘अच्छे दिन’ कधी? याचीच उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
>महागाईच्या तुलनेत पगारात वाढ नाही
रोजच वाढत्या इंधन दरवाढीमुळे भाजीपाला, कडधान्य, किराणा, कपडे यासह सर्वच जीवनावश्यक वास्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र त्याप्रमाणात पगारात वाढ झाली नसल्याने महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ बसवणार कसा हा खरा अनेकांच्या समोर प्रश्न आहे. तसेच तोंडावर आलेल्या सणाचा गोडवा गोड होणार कसा, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहेत.
>सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट!
देशात दर महिन्याला दोनदा इंधनाचे दर कमी जास्त होत होते मात्र केंद्र शासनाच्या सध्याच्या धोरणानुसार दररोज इंधनाचे दार बदलत आहेत़ सध्याचे दर रुपये ८० च्या वर गेले आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत़ त्यामुळे महिलांचे महिना काठीचे बजेट कोलमडत आहे. नागरिकांना शासनाकडून दिलासा मिळण्या ऐवजी इंधन दरवाढीच्या रूपाने झटकेच मिळत आहेत. पेट्रोल, डिझेल व घरगुती वापराच्या गॅसची दरवाढ ही अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत आहे. ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा करणाºया नागरिकांना रोजच्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीने हैराण केले आहे. सरकार मायबापा सांगा आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
>न दिसणारी इंधन वाढ
काही वर्षांपूर्वी महिन्यातून दोनदा इंधनाच्या दरात चढउतार होत होता़ त्यामुळे इंधनाचे दर कमी होणार की वाढणार हे समजत होते़ मात्र सध्याच्या सरकारने हा फार्मुला बंद करून इंधनाचे दर दररोज वाढविण्याचे किंवा कमी करण्याचे अधिकार दिले आहेत. तेव्हापासून इंधनाचे दर कमी कधी झालेच नाहीत़ उलट वाढतच गेले़ न दिसणारी ही इंधन दरवाढ सर्वसामान्यांच्या जगण्यासाठी कर्दनकाळ ठरणार आहे.
>नेहमीच्याच गॅस दरवाढीने घरातील आर्थिक नियोजन करताना नकोसे वाटत आहे. या दरवाढीमुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडत असल्याने मिळणाºया तुटपुंज्या पगारामध्ये संसाराचा गाडा चालवणे कठीण झाले आहे.रॉकेलदेखील ५० ते ६० रुपये लिटर असल्याने ते देखील वापरासाठी परवडत नाही. भाड्याच्या घरात राहत असल्याने चूल पेटवण्यासाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध होत नाही. त्यामुळे ‘एकीकडे आड, तर दुसरीकडे विहीर’, अशी परिस्थिती आम्हासारख्या सर्वसामान्यांची झाली आहे.
- छाया देसाई, गृहिणी, रहाटणी
>आम्ही दोघेही नोकरीस असून येणाºया पगारावर घर प्रपंच चालवतो. घर खर्चासाठी पूर्वी एका महिन्याला लागणारे बजेट आता १५ दिवसदेखील पुरत नाही. इंधन दरवाढीचा बोजा सर्वसामान्यांवर लादण्यात येत आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे आम्हाला जगणे कठीण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले असून ते आवाक्यात आणण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. निदान स्वयंपाकाचा गॅस तरी स्वस्त दारात उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा आहे.
- मीनल कुलकर्णी, गृहिणी व कर्मचारी
>रोजच इंधनाची दरवाढ करून शासन सर्वसामान्य नागरिकांची कुचंबणा करीत आहे. बसचे पास, रिक्षाचे भाडे, शाळेच्या बसचे भाडे यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे आई-वडिलांना घर खर्चासाठी कसरत करावी लागत आहे. शैक्षणिक साहित्याचेही दर आवाक्याबाहेर गेले आहेत. खर्चाचा मेळ घालताना आमच्या सारख्या अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- तृप्ती सावे, महाविद्यालयीन विद्यार्थिनी
>मी एक अभियंता असून, कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्वी एक महिन्यासाठी जेवढे पेट्रोल लागत होते, ते आता १५ दिवसांसाठी देखील पुरत नाही. शासनाच्या निर्णयामुळे आम्हा सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. डिझेल, पेट्रोल, गॅसची नेहमी होणाºया दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे सर्व दर आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे घरप्रपंच चालविणे कठीण झाले आहे. शासनाने महागाईवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
- प्रवीण हुंबे, संगणक अभियंता
>माझा स्वत:चा चारचाकी टेम्पो असून, तो एका खासगी कंपनीला एका वर्षासाठी भाडे करारावर दिला आहे. रोजच्या इंधन दरवाढ झाल्याने त्या वेळच्या बाजारभावाप्रमाणे केलेला करार मला आता परवडत नाही. दरवाढीमुळे चालक ठेवणेसुद्धा परवडत नाही. मी स्वत: टेम्पो चालवत आहे. त्यावरच संसाराचा गाडा कसाबसा चालतो. वाढती महागाई मारक असून, यात गोरगरिबांचे जगणे कठीण झाले आहे.
- घनश्याम पाटील, वाहनचालक

Web Title: People also hit inflation with sunshine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.