राष्ट्रवादीशी शिवसेनेची गुप्तगू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 04:27 PM2019-01-14T16:27:16+5:302019-01-14T16:28:52+5:30
मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असताना पार्थ पवार यांच्या शिवसेना आणि अपक्ष नगरसेवक भेटीचे एक छायाचित्र व्हायरल झाले आहे.
पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असताना पार्थ पवार यांचा शिवसेना आणि अपक्ष नगरसेवक भेटीचे एक छायाचित्र व्हायरल झाले आहे. त्यामुळे शिवसेना आणि अपक्ष नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेसशी काय गुप्तगू सुरू आहे, याबाबत राजकीय वतुर्ळात चर्चा सुरू आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातील खासदार श्रीरंग बारणे यांना माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारी विषयी विचारले असता, ‘कोण पार्थ पवार? असा प्रश्न बारणे यांनी उपस्थित केला होता. त्यावरून बारणे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते दत्ता साने यांच्यात जुंपली होती. गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांत जुंपली असताना पार्थ पवार यांच्या समवेत शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचे पुतने अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांचे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. या छायाचित्रात पवार यांच्यासह कलाटे, जगताप, विरोधीपक्षनेते दत्ता साने, माजी महापौर राजू मिसाळ, अभय मांढरे हे दिसून येत आहेत.
पार्थ पवार यांच्या मावळच्या उमेदवारीवरून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत चिखलफेक सुरू आहे. तर दुसरीकडे गुप्तगू करण्याचे छायाचित्रे व्हायरल झाल्याने चर्चांना उत आला आहे. शिवसेनेचे गटनेते कलाटे आणि आमदार पुतने राष्ट्रवादीत जातात की काय? अशी चर्चाही रंगली आहे. खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी शह देण्यासाठी ही पार्थ भेट तर नव्हे ना? जगताप व बारणे विरोधकांची राष्ट्रवादीशी काय गुप्तगू सुरू ? अशीही चर्चा रंगली आहे.
याबाबत शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे म्हणाले, ‘‘माजी महापौर राजू मिसाळ यांचा प्राधिकरणात सामाजिक कार्यक्रम होता. त्यास सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मीही त्या कार्यक्रमास उपस्थित होतो. त्यावेळेस योगायोगाने पार्थ पवारही आणि अन्य राष्ट्रवादीचे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यावेळेसचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. कार्यक्रमात अनपेक्षीत झालेल्या भेटीस राजकीय रंग देणे चुकीचे आहे. मी शिवसेनेचा गटनेता आहे. राष्ट्रवादीशी सलगी साधण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’’