मद्यसाठा बाळगणारे दोघे गजाआड
By admin | Published: March 21, 2017 05:17 AM2017-03-21T05:17:32+5:302017-03-21T05:17:32+5:30
गोवा राज्यातच विक्री करता येईल, अशा मद्याचा साठा बाळगलेल्या दोन आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी
पिंपरी : गोवा राज्यातच विक्री करता येईल, अशा मद्याचा साठा बाळगलेल्या दोन आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह पकडले. त्यांच्याकडून एका मोटारीसह सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उत्पादनशुल्क विभागाच्या पथकाने केली.
उत्पादनशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मधुकर विधाते (वय ३३, रा. विधातेवस्ती, बाणेर), हेमंत पाटील मुरकुटे (वय ३५,बाणेर रस्ता, पुणे) या दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. चिंचवड स्टेशन येथे वाहनांची तपासणी करीत असताना, आरोपींच्या मोटारीची तपासणी केली. त्या वेळी मोटारीत मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आढळून आला. चालकाच्या आसनामागे मद्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या. मद्याच्या बॉक्सवर केवळ गोवा राज्यात विक्रीकरिता असे नमूद केले असल्याने गोवा राज्यातील मद्यसाठा महाराष्ट्रात कसा आला, असा प्रश्न अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. आरोपी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. मुद्देमालासह ताब्यात घेतले.
राज्य उत्पादनशुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओव्हाळ, अधीक्षक मोहन वर्दे, फुलपगार, ई विभाग पिंपरी कार्यालयाचे उपनिरीक्षक विजय शिर्के,सूरज दाबेराव, मुकुंद परांडकर, सहायक दुय्यम निरीक्षक गवारी, धनंजय के पाटील, स्वप्निल दरेकर, रवि लोखंडे, सूरज घुले यांच्या पथकाने कारवाई केली. (प्रतिनिधी)