महापालिका, सामाजिक संघटनांच्या उपक्रमाने वाढली ‘मतांची’ टक्केवारी
By admin | Published: February 22, 2017 02:55 AM2017-02-22T02:55:09+5:302017-02-22T02:55:09+5:30
निवडणूक विभागाकडून करण्यात आलेली जनजागृती, विविध संस्था संघटनांकडून देण्यात आलेल्या वेगवेगळ्या सवलती
पिंपरी : निवडणूक विभागाकडून करण्यात आलेली जनजागृती, विविध संस्था संघटनांकडून देण्यात आलेल्या वेगवेगळ्या सवलती यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. गेल्या वीस वर्षानंतर प्रथमच मतदानाची टक्केवारी ६८ टक्क्यांवर पोहोचली. मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मतदानाचा टक्का वाढवून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक विभागाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. पथनाट्य, पत्रकवाटप, सोसायटींमध्ये आवाहन, विविध संस्थांच्या बैठका यासह फलकांमार्फत जनजागृती करण्यात आली. काही सामाजिक संस्था, व्यावसायिक संघटना देखील पुढे सरसावल्या. काही व्यावसायिक संघटनांकडून मतदान करणाऱ्यांना सवलती देण्यात आल्या. यामुळे गेल्या वीस वर्षानंतर प्रथमच मतदानाची टक्केवारी ६८ टक्क्यांपर्यंत पोहोचली.
१९९७ ला ६८. ६५ टक्के मतदान झाले होते. मात्र, त्यानंतरच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली. २००२ ला ५९. ५१ टक्के मतदान झाले. तर २००७ ला ५७ . १७ टक्के मतदान झाले. मागील पंचवार्षिकला मतदानाची टक्केवारी आणखीनच घसरली. २०१२ ला अवघे ५४. ८४ टक्केच मतदान झाले. १९९७ नंतर प्रथमच ६८ टक्के मतदान झाले. (प्रतिनिधी)