एक फाेटाे पडला पावणे आठ लाखांना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 05:25 PM2018-12-28T17:25:52+5:302018-12-28T17:28:36+5:30
लग्न समारंभात फोटो काढण्यासाठी तब्बल पावणे आठ लाखांचा ऐवजे असलेली पर्स टेबलवर ठेवली अन् काही वेळातच चोरीला गेली. ही घटना कासारवाडी येथील गंधर्व रिमा लॉन्स येथे बुधवारी सायंकाळी घडली.
पिंपरी : लग्न समारंभात फोटो काढण्यासाठी तब्बल पावणे आठ लाखांचा ऐवजे असलेली पर्स टेबलवर ठेवली अन् काही वेळातच चोरीला गेली. ही घटना कासारवाडी येथील गंधर्व रिमा लॉन्स येथे बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रामचंद्र गणपतराव झरकर (वय ५९, रा. लक्ष्मी निवास अपार्टमेंट, सदाशिव पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, झरकर दाम्पत्य हे गंधर्व रिमा लॉन्स येथे बुधवारी सायंकाळी लग्नासाठी आले होते. लग्न झाल्यानंतर जेवण करुन ते तेथे बसले होते. त्यावेळी नातेवाईकांनी त्यांना फोटो काढण्यासाठी स्टेजवर बोलाविले. दरम्यान, झरकर यांच्या पत्नीने आपल्या हातातील पर्स तेथील बाकावर ठेवून फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेल्या. फोटो काढून आल्यानंतर बाकावर पर्स पाहिली असता त्याठिकाणी पर्स नव्हती. त्यामुळे भोसरी पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली.
या पर्समध्ये चार आणि सहा तोळयाचा नेकलेस, दहा तोळयाचा हार, ३५ तोळयाचे बाजूबंध, ४१ ग्रॅमचे गंठण, दीड तोळयाची कर्णफुले, दोन मोबाईल असा ७ लाख ७७ हजार ३०० रुपयांचा ऐवज होता. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.