खासगी प्रवासी बसमधून प्रवाशांच्या बॅगा व साहित्य चोरणारा चोरटा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 03:19 PM2020-03-06T15:19:02+5:302020-03-06T15:20:49+5:30
दोन लॅपटॉप, दोन फास्ट्रक कंपनीचे गॉगल, हेडफोन,लॅपटॉप चार्जर, असा 1 लाख 32 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
लोणावळा : खासगी प्रवासी एसटी बसमधून प्रवाशांच्या बॅगा व साहित्य चोरणार्या अट्टल चोरट्याला जेरबंद करण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश आले आहे.
अमोल शिवाजी ढोबळे (वय 33, रा. सह्याद्रीनगर नाईटफिट रोड, घाटकोपर पुर्व मुंबई) असे या चोरट्याचे नाव असून त्याच्यावर खोपोली पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यापुर्वी लोणावळ्यातील निता व्होल्वो हॉटेल, एनएच फोर हॉटेल, खोपोली फुडमॉल येथे चहापानाकरिता थांबलेल्या खासगी प्रवासी बसमधून ढोबळे याने प्रवाशांच्या बॅगा व मौल्यवान साहित्यांची चोरी केली होती. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सामिल प्रकाश, पोलीस नाईक वैभव सुरवसे, जीवन गवारी, अजिज मेस्त्री, मनोज मोरे, राजेंद्र मदने, पवन कराड, राहूल खैरे यांचे पथक लोणावळा शहरात गस्त घालत असताना सदरचा आरोपी हा खोपोलीत असल्याची माहिती वैभव सुरवसे यांना मिळाल्यानंतर वरील पथकाने खोपोलीत जाऊन अमोल ढोबळे याला ताब्यात घेत अटक केली. तपासात त्यांच्याकडून चोरी केलेले दोन लॅपटॉप, दोन फास्ट्रक कंपनीचे गॉगल, चार्जर, हेडफोन, लॅपटॉप चार्जर, केसर असा सुमारे 1 लाख 32 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ढोबळेकडून चोरीचे आजुनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून याप्रकरणी लोणावळा शहरचे गुन्हे शोध पथक पुढील तपास करत आहे.