मुलाला पळवून नेल्याचा फोन आला अन् पोलिसांची धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 12:26 PM2019-10-07T12:26:48+5:302019-10-07T12:29:30+5:30

पोलिसांनी दाखविली सतर्कता, चुकीच्या माहितीमुळे दमछाक 

A phone call was made to kidnap of boy and after police ran | मुलाला पळवून नेल्याचा फोन आला अन् पोलिसांची धावाधाव

मुलाला पळवून नेल्याचा फोन आला अन् पोलिसांची धावाधाव

Next
ठळक मुद्देपिंपरीतील शाहूनगर येथील प्रकार

पिंपरी : अपहरणाचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून दक्षता घेण्यात येते. त्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यास मदतही होते. मात्र काहीवेळा चुकीच्या माहितीमुळे पोलिसांची धावपळ होते, मात्र प्रत्यक्षात गुन्हा किंवा बेकायदेशीर कृत्य घडलेलेच नसते. असाच एक प्रकार चिंचवड येथे नुकताच घडला. तोंडावर स्प्रे मारून सहा ते सात वर्षांच्या मुलाचे दुचाकीवरून अपहरण झाल्याचा फोन पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे आला अन् एकच धावाधाव सुरू झाली...
एक १७ वर्षीय मुलगा चिंचवड, शाहूनगर येथे रात्री साडेनऊच्या सुमारास दांडिया खेळण्यासाठी जात होता. त्या वेळी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने एक सुमारे २५ वर्षीय दुचाकीस्वार सहा ते सात वर्षांच्या मुलाला दुचाकीवर पालथे झोपवून घेऊन जात असल्याचे त्याला दिसले. हा नेमका काय प्रकार आहे, याबाबत मुलगा विचार करायला लागला. हे अपहरण तर नाही ना, असा संशय त्याला आला. त्यामुळे १७ वर्षीय मुलाने त्याच्या एका मित्राला सांगितले. 
मित्राने त्याच्या वडिलांना सांगितले. वडिलांनी नगरसेवकास माहिती दिली. नगरसेवकानेही सतर्कता दाखवून शंभर क्रमांकावर फोन करून नियंत्रण कक्षाला माहिती दिली. ‘‘तोंडावर स्प्रे मारून एका सहा ते सात वर्षांच्या मुलाला दुचाकीवर पालथे झोपवून एक तरुण घेऊन जात आहे. शाहूनगर येथे हा प्रकार घडला असून, हा अपहरणाचा प्रकार दिसून येत आहे,’’ असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे नियंत्रण कक्षाकडून संबंधित पोलीस अधिकाºयांना याबाबत कळविण्यात आले.
..........
पोलीस दाखल होईपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते. प्रत्यक्षदर्शी असलेला १७ वर्षीय मुलगाही घटनास्थळी होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू केली. अचानक इतके पोलीस बघून त्याची भंबेरी उडाली. काय बोलावे, काय काय सांगावे, असे त्याला काही सूचत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. माझ्या घरच्यांना सांगू नका, नाही तर मला घरचे खूप रागावतील, असे मुलाने सांगितले. पोलिसांनी त्याला धीर दिला. त्यानंतर मुलाने माहिती सांगितली. पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू केला. 


पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती देण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेज तपासण्यात आले. दहा वाजल्यापासून रात्री साडेबारापर्यंत तपास सुरू होता. मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार घेऊन कोणी आले आहे का, याबाबत सर्व पोलीस ठाण्यांत पुन्हा चौकशी करण्यात आली. त्यामुळे अपहरण झालेच नसल्याचे स्पष्ट झाले.
,...............
सार्वजनिक, तसेच स्वत:च्या सुरक्षेबाबत नागरिकांनी सतर्क राहावे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला योग्य माहिती द्यावी. जेणेकरून पोलीस यंत्रणेला योग्य दिशेने तपास करणे शक्य होऊन गुन्हे रोखण्यात मदत होईल. - प्रकाश मुत्त्याल, सह पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
 

Web Title: A phone call was made to kidnap of boy and after police ran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.