फोन ए फ्रेंड अन् पोलीस आपल्या दारी! आयुक्तालयाच्या कार्यपद्धतीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 02:45 AM2018-09-26T02:45:54+5:302018-09-26T02:46:13+5:30
‘पोलीस आपल्या दारी’ व ‘फोन अ फ्रेंड’ हे उपक्रम सुरू करीत आहोत, अशी माहिती पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली.
पिंपरी : पोलीस ठाण्यातील ‘ड्युटी आॅफिसर’ हा त्या ठाण्याचा सर्वेसर्वा असा काहीसा समज निर्माण करण्यात आला आहे. सर्वांना सर्व प्रकारच्या कामाची सवय आणि जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे, अशा पद्धतीने पोलिसांच्या कार्यपद्धतीत बदल केले आहेत. ‘पोलीस आपल्या दारी’ व ‘फोन अ फ्रेंड’ हे उपक्रम सुरू करीत आहोत, अशी माहिती पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाले. पोलीस आयुक्तालयांतर्गत सर्व विभाग सुरू होतील एवढे मनुष्यबळ सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे सायबर सेल, गुन्हे, परकीय नागरिक पडताळणी विभाग, जलद प्रतिसाद पथक असे विविध विभाग सुरू करण्यास काही कालावधी लागणार आहे. तोपर्यंत आहे त्या मनुष्यबळात काम करायचे असेल, तर मनुष्यबळाचा योग्य प्रकारे वापर करावा लागणार आहे. त्यामुळे कार्यपद्धती आणि कामकाजात काही बदल घडवून आणले आहेत. सध्या आहे त्या मनुष्यबळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये पथके तयार केली आहेत. या पथकात कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त आठ पोलीस असतील. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पोलीस घटनास्थळी दाखल होतील. ‘ड्युटी आॅफिसर’ ही संकल्पना सध्या तरी शहरात अमलात येणार नाही.
बेशिस्तांवर कारवाई
वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ५०० जॅमर तयार करून घेतले आहेत. डबल पार्किंगमधील वाहनांना जॅमर लावले जातील. सिग्नलच्या अलीकडे आणि पलीकडे
काही अंतरावर पार्किंगला मनाई केली आहे. रस्त्यावरील अतिक्रमण
हटवून रस्ता रुंदीकरण होऊ शकते. रस्ते रुंद झाल्यास सिग्नलची वेळ कमी करून वाहतूक खुली करणे शक्य होईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या घरी जाऊन दंड
वसूल करण्यासाठी चलन मशिनसुद्धा उपलब्ध झाल्या आहेत, अशी
माहिती अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.
उपक्रम : नागरिकांशी साधणार थेट संवाद
पुढील आठवड्यापासून ‘पोलीस आपल्या दारी’ हा उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमात विविध गृहसंस्थांच्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून पोलीस दंड वसूल करतील. त्याचबरोबर सोसायटीत कोणाला काही त्रास आहे का, कौटुंबिक हिंसाचाराचा काही प्रकार आहे का, यासंबंधीही पोलीस थेट नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
दूरध्वनीवरून कोणीही संपर्क साधल्यास तत्काळ पोलीस पथक हजर होईल, अशी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. नागरिकांनी पोलिसांची मदत मागितल्यास तातडीने पोलीस पथक हजर होईल. विविध पोलीस ठाण्यांमध्ये ही पथके तयार केली जातील. ज्या वेळी आवश्यकता भासेल त्या वेळी त्या त्या भागातील पथकाला पाचारण केले जाईल. नागरिकांनी अगदी फसवे कॉल केले, तरी पोलीस तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतील. पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) २७४५०८८८ आणि २७४५०६६६ या दूरध्वनी क्रमांकावर नागरिक संपर्क साधू शकतात. त्यांना या क्रमांकांवरून पोलिसांचा प्रतिसाद मिळू शकेल.
स्टेशन कोणाचे संस्थान नाही
१ पिंपरी : सध्या काही पोलीस अधिकारीच मी कोणाला भेटायचे हे ठरवतात. ज्या लोकांना मला भेटायचे आहे, त्यांना माझ्यापर्यंत पोहोचू दिले जात नाही, असा प्रकार सुरू असल्याचे माझ्या लक्षात आले आहे. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. पोलीस आयुक्त कार्यालयापासून ते प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘व्हिजिटर्स बुक’ ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस ठाण्यात आणि आयुक्त कार्यालयात कोण, कशासाठी, कोणाला भेटण्यास आले, याचा रोजचा तपशील नोंदविण्यात यावा, अशी सक्त ताकीद पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली.
२पोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाºयांना भेटणे सामान्यांना सुलभ होणे आवश्यक आहे. परंतु पोलीस ठाण्यातील अधिकारी ‘कामात आहे’, ‘नंतर या’, ‘एवढंच काम आहे का’ अशी दुरुत्तरे करून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे अनेकदा वेळेत तक्रारअर्ज, फिर्याद दाखल होत नाही. पोलीस अधिकाºयांच्या अशा वर्तणुकीमुळे नागरिकांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट बनला आहे.
३नागरिकांनी पोलिसांच्या भेटीला येण्याऐवजी पोलिसांनीच नागरिकांच्या भेटीला गेले पाहिजे, अशी कार्यपद्धती अवलंबण्यासाठी आग्रही असल्याचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘काही पोलीस अधिकाºयांनी पोलीस ठाणे म्हणजे स्वत:चे संस्थान बनविले आहे. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त दर्जाचे उच्चपदस्थ अधिकारी नागरिकांना सहज भेटतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात. याउलट पोलीस ठाण्यात अधिकारी ताटकळत ठेवतात.
४ हिंजवडी परिसरात मुलींच्या वसतिगृहात रात्री एका तरुणाने प्रवेश केला. मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांकडे दाद मागण्यास गेलेल्यांना पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारदार तरुणीने वकिलामार्फत नोटीस पाठविल्यानंतर ही बाब माझ्यापर्यंत पोहोचली. काही तरी गडबड आहे, हे लक्षात येताच प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेतले. याप्रकरणी चौकशीचा आदेश दिला आहे. हिंजवडीतील सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांची नियंत्रण कक्षात बदली केली असून, इतर दोषींवरही कारवाई करणार आहे.’’