मतदारयादीत छायाचित्र बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 02:05 AM2018-10-04T02:05:50+5:302018-10-04T02:05:54+5:30
मतदान कार्ड नाही किंवा कार्डावर छायाचित्र नाही, हे एकवेळ चालू शकेल. परंतु मतदारयादीमध्ये छायाचित्र बंधनकारक आहे
पुणे : निवडणूक शाखेतर्फे पुणे शहर आणि जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारयादीत छायाचित्र नसणाऱ्या मतदारांना मतदान करता येणार नाही़ त्यामुळे मतदारयादीत छायाचित्रे नसल्यास मतदार नोंदणी अधिकारी किंवा निवडणूक शाखेकडे तातडीने रंगीत छायाचित्रे द्यावीत, असे आवाहन विभागीय आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि जिल्ह्यातील दहा अशा २१ विधानसभा मतदारसंघांमधील मिळून मतदारांची संख्या ७१ लाख ८९ हजार २६५ आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील प्रारूप याद्या जिल्हा प्रशासनाकडून एक सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यात अनेक मतदारांची छायाचित्रे नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मतदारयादीत छायाचित्र नसणाºया मतदारांना मतदान करता येणार नाही, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले आहे. मतदारांनी प्रारूप मतदारयादी पाहून आपली छायाचित्रे मतदारयादीत आहेत किंवा नाहीत, याची खात्री करून घ्यावी. तसेच छायाचित्र नसल्यास रंगीत छायाचित्र संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा आपापल्या जिल्ह्याच्या निवडणूक शाखेकडे जमा करावे, असे आवाहन म्हैसेकर यांनी केले आहे.
मतदान कार्ड नाही किंवा कार्डावर छायाचित्र नाही, हे एकवेळ चालू शकेल. परंतु मतदारयादीमध्ये छायाचित्र बंधनकारक आहे. मतदारयादीतील छायाचित्र तपासून संबंधित मतदाराला मतदानाच्या दिवशी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना अशा अधिकृत पुराव्यांच्या माध्यमातून मतदान करता येणार आहे, असेही म्हैसेकर यांनी सांगितले आहे. प्रारूप मतदारयादीबाबत नागरिकांच्या हरकती ३१ आॅक्टोबरपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत.