महामार्गावर लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 02:20 AM2019-04-02T02:20:20+5:302019-04-02T02:20:36+5:30
मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड ते कामशेत या भागातील महामार्गाच्या कडेला असलेल्या लॉजिंगमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असून
कामशेत : मुंबई-पुणे महामार्गावर ठिकठिकाणी लॉजमध्ये देहविक्रीच्या व्यवसाय सुरू आहे. सोमाटणे, देहूरोड आणि तळेगाव आदी भागातील महामार्गावरील व्यवसाय विस्तारित होऊन कामशेत आदी भागात सुरू झाला आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड ते कामशेत या भागातील महामार्गाच्या कडेला असलेल्या लॉजिंगमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असून, त्यामुळे आजूबाजूच्या भागात असलेल्या वसाहतीतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होत आहे. सोमाटणे, तळेगाव, वडगाव, कान्हे फाटा, कामशेत आदी भागात वेश्याव्यवसाय मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक प्रतिष्ठित लोकांचे लॉजिंग सुरू असून, यात अनेक अवैध धंदे सुरू आहेत. हाच प्रकार वडगाव व कामशेत महामार्ग परिसरात आहे. शिवाय येथे हुल्लड, व्यसनाधीन युवकांकडून पर्यटक, नागरिक, प्रवासी आदींची लूट, मारहाण आदी प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.
महामार्गावर सुरू असलेल्या या अवैध देहविक्रीच्या व्यवसायाला चाप बसावा, म्हणून पोलीस प्रशासन ठोस पावले उचलत नाही. त्यामुळेच वडगाव, कामशेतसारख्या भागात त्यांचे पेव फुटले आहे. कामशेतमध्ये काही दिवसांपूर्वीच गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने महामार्गावरील एका लॉजवर कारवाई केली. स्थानिक पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने हा व्यवसाय कामशेत व परिसरात वाढू लागला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाईची विशेष मोहीम राबवणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. तसेच कामशेतमधील महामार्गावर सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरिक करीत आहेत.
बेरोजगार युवक : गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
मावळ तालुक्यामध्ये जमिनीला मोठ्या प्रमाणात भाव आला आहे. त्यामुळे अनेक युवक झटपट श्रीमंत झाले आहेत. तसेच या भागामध्ये अनेक युवक बेरोजगारही आहेत. लॉजधारकांनी अशा युवकांना सावज शोधण्याच्या कामासाठी पगार देऊन ठेवले आहे. हे युवक अनेक वेळा बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना त्रास देतात. तसेच लुटमारीच्या घटनेतही वाढ झाली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटत चालली आहे. महामार्गावर राजरोसपणे सुरू असलेला देहविक्रीचा व्यवसाय बंद करण्याची मागणी होत आहे.