पिंपरीतील एच. ए. कंपनीतील भंगार साहित्याला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:11 IST2025-03-27T12:11:13+5:302025-03-27T12:11:29+5:30

पिंपरी : पिंपरीतील एच. ए. कंपनीतील भंगार साहित्याला आग लागली. ही घटना बुधवारी (दि. २६) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. ...

pimpari-chinchwad Fire breaks out at scrap material at H. A. Company in Pimpri | पिंपरीतील एच. ए. कंपनीतील भंगार साहित्याला आग

पिंपरीतील एच. ए. कंपनीतील भंगार साहित्याला आग

पिंपरी : पिंपरीतील एच. ए. कंपनीतील भंगार साहित्याला आग लागली. ही घटना बुधवारी (दि. २६) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. यात गवत आणि भंगार साहित्य जळाले.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील एच. ए. कंपनीला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलास मिळाली. त्यानुसार आगीचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. कंपनीतील भंगार साहित्यासह आसपासच्या गवतालाही आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशमन दलाची दमछाक झाली.

यापूर्वी ४ जून २०२० रोजी एच. ए. कंपनीत आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन विभागाने कंपनीला नोटीसही दिली होती. या नोटिसीमध्ये सदर औद्योगिक कारखान्यामधील ॲसिड टँक परिसरालगत इलेक्ट्रिकल वायरिंग जमिनी लगत केलेली असून, त्यावर कागदी पुठ्यांचे बॉक्स, प्लास्टिकच्या व वैद्यकीय बॉटल्स, वाळलेली झाडेझुडपे, गवत साठविण्यात आलेले होते. तसेच अन्य ज्वलनशील स्क्रॅप मटेरियल अस्ताव्यस्त अवस्थेत ठेवण्यात आले होते. औद्योगिक कारखान्यामध्ये अग्निशमन कार्याकरिता आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध नव्हता. औद्योगिक कारखान्यामधील स्थायी अग्निशमन यंत्रणेचा वापर उपलब्ध तैनात सुरक्षा रक्षकाद्वारे करणे आवश्यक होते; परंतु स्थायी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध झाली नाही.

 एच. ए. कंपनीत मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे, गवत वाढलेले असून ते वेळोवेळी छाटण्यात व काढण्यात आलेले नसल्याने मोठ्या आगीचा धोका संभवतो. प्रत्यक्ष आगीच्या परिस्थितीत सुरक्षिततेने कार्य करण्याकरिता सुरक्षा रक्षकांना व अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले नव्हते, असे त्यावेळी अग्निशमन दलातर्फे सूचित करण्यात आले होते. अग्निशमन विभागाने २०२० मध्ये नोटीस दिल्यानंतरही कंपनीने काहीच उपाययोजना केली नाही. मात्र, बुधवारी लागलेल्या आगीबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

एच. ए. कंपनीलगत असलेल्या लोहमार्गालगतचे गवत जाळण्यासाठी आग लावली होती. गवत जाळताना उडालेल्या ठिणगीमुळे एच. ए. कंपनी परिसरातील गवताला आग लागली. मात्र, मोठे नुकसान झाले नाही.  - अशोक कडलग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पिंपरी  

Web Title: pimpari-chinchwad Fire breaks out at scrap material at H. A. Company in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.