महापालिकेकडे ८९ कोटींची थकबाकी; उद्योगनगरीत ‘पाणीबाणी’चे संकट गडद..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:40 IST2025-03-25T11:39:49+5:302025-03-25T11:40:05+5:30
आधीच पाणी वितरणाची यंत्रणा सक्षम नसल्यामुळे सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा; प्रदूषण आणि थकबाकीमुळे पाणी बंद करण्याचा जलसंपदा विभागाचा इशारा

महापालिकेकडे ८९ कोटींची थकबाकी; उद्योगनगरीत ‘पाणीबाणी’चे संकट गडद..!
पिंपरी : महापालिकेची शहरातील पाणी वितरणाची यंत्रणा सक्षम नसल्यामुळे शहरात गेल्या सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहरात पाण्याची मागणी वाढली असून, काही भागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यातच जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षामुळे कमी पाणी मिळत असल्याने पुन्हा संकट उभे राहिले आहे. जलप्रदूषण केल्यामुळे, तसेच महापालिकेने ८९ कोटींची थकबाकी ३१ मार्चपर्यंत भरली नाही, तर पाणी बंद करण्याचा इशाराच जलसंपदा विभागाने दिला आहे.
महिनाभर गुंगारा देणारा शिवद्रोही प्रशांत कोरटकर जाळ्यात कसा अडकला?
शहराची वाढती गरज लक्षात घेऊन आंद्रा धरणातून चिखली जलशुद्धिकरण केंद्रात १०० एमएलडी पाणी आणले जाते. ते पाणी शुद्ध करून महापालिकेकडून शहराच्या विविध भागात पुरविले जाते. परंतु, मागील पंधरा दिवसांपासून आंद्रा धरणातून १०० एमएलडी नव्हे, तर फक्त ४६ ते ५० एमएलडीपर्यंत पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेवर ताण निर्माण झाला असून, या पाण्यावर अवलंबून भागातील नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
आंद्रा धरणातून कमी पाणी
पवना धरणातून ४९० एमएलडी आणि एमआयडीसीकडून ३० एमएलडी असे एकूण ५२० एमएलडी पाणी दररोज शहराला दिले जात होते. त्यामध्ये आंद्रा धरणातून मिळणाऱ्या १०० एमएलडी पाण्याची वाढ झाली आहे. ते पाणी निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यातून उचलून चिखली येथील जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत आणले आहे. तेथून पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक टाक्यांना जोड देण्यासाठी जलवाहिनी टाकली आहे.
ते पाणी डिसेंबर २०२३ पासून शहरातील विविध भागात पुरविले जात आहे. मात्र, आंद्रा धरणातून सोडले जाणारे १०० एमएलडी पाणी मागील पंधरा दिवसांपासून पूर्ण क्षमतेने पालिकेला उपलब्ध होत नाही. ४६ ते ५० एमएलडीदरम्यान पाणी उचलले जात आहे. परिणामी, कमी पाणी उपलब्ध झाल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सलग पंधरा दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने या चिखली जलशुध्दिकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या चिखली, मोशी, तळवडे, चऱ्होली, भोसरी, दिघी या भागात हा परिणाम जाणवत आहे. नागरिकांकडून पाणी कमी दाबाने व विस्कळीत येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
विनाप्रक्रिया सांडपाणी नदीत सोडणे महापालिकेला भोवले
पिंपरी - चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी नदी पात्रात सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सोडणे हे महापालिकेला भोवले आहे. जलसंपदा विभागाकडून महापालिकेने दिलेले पाणी हे पवना, इंद्रायणी नदी पात्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी सोडणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेकडून नदीपात्रात सोडलेल्या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सोडल्याने नदीचे प्रदूषण वाढले आहे. नदी प्रदूषण केले म्हणून महापालिकेला जलसंपदा विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे, तसेच पाणी बंद करण्याचाही इशारा जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनी दिला आहे.
आंद्रा धरणातून दररोज १०० एमएलडी पाणी मिळते. परंतु, काही दिवसांपासून हे खूपच कमी येत आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेवर होत आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून, त्यावर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. पवना धरणातून सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. - प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका