किरकोळ कारणावरून वर्कशॉपमधील कामगारावर खुनी हल्ला
By नारायण बडगुजर | Updated: April 19, 2025 20:11 IST2025-04-19T20:09:59+5:302025-04-19T20:11:02+5:30
या भांडणाचा राग मनात धरून संशयितांनी आपसात संगनमत करून आणखी दोन साथीदारांसोबत पुन्हा आले.

किरकोळ कारणावरून वर्कशॉपमधील कामगारावर खुनी हल्ला
पिंपरी : वर्कशॉपमधील दोन कामगारांना मारहाण करीत एकावर खुनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल असून, तीन जणांना अटक केली आहे. ही घटना बाणेर येथील नेक्सा वर्कशॉपमध्ये गुरुवारी (दि. १७) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
शुभम बनकर, गणेश ऊर्फ हनुमंत पारखे (२२, रा. बाणेर गावठाण), अनिल गौतम टेकुळे (२०, रा. बालेवाडी गाव, पुणे) आणि रोहित सुभाष बगाडे (२२, रा. गणराज चौक, बाणेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पारखे, टेकुळे आणि बगाडे यांना पोलिसांनीअटक केली आहे. सर्फराज मजिद अन्सारी (२५, रा. बाणेर) यांनी शुक्रवारी (दि. १८) याबाबत बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनकर आणि त्यांचा मित्र पारखे यांच्यासोबत गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून संशयितांनी आपसात संगनमत करून आणखी दोन साथीदारांसोबत पुन्हा आले. त्यांनी वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या सबरेआलम याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी सर्फराज यांच्या नाकावर बुक्की मारून नाकाचे हाड फॅक्चर केले.