श्री संत तुकाराम साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोधकडे ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:47 IST2025-03-26T13:47:07+5:302025-03-26T13:47:19+5:30
- निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दुजोरा नाही, आज चित्र स्पष्ट होणार

श्री संत तुकाराम साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोधकडे ?
चांदखेड : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विक्रमी २२६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीमध्ये ५ अर्ज बाद झाले, तर २६ उमेदवारांनी दुबार अर्ज भरल्याने काढण्यात आले. छाननीनंतर १९५ उमेदवार रिंगणात राहिले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख मंगळवारी (दि. २५) होती.
परंतु, उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त असल्याने रात्री उशिरापर्यंत किती उमेदवारी अर्ज माघारी घेतले व किती उमेदवारी अर्ज रिंगणात शिल्लक राहिले? यावर काम चालू असल्याने अधिकृत माहिती बुधवारी (दि. २६) देणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही निवडणूक बिनविरोध झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. संचालकांची अधिकृत यादी बुधवारी जाहीर होईल, अशी चर्चा परिसरामध्ये सुरू आहे. नव्या संचालक मंडळामध्ये नवीन १६ चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब ऊर्फ विदुरा नवले यांच्या नेतृत्वामध्ये संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी जुन्या नव्यांचा समन्वय साधत सर्वपक्षीय उमेदवारांच्या श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची माजी खासदार व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश घुले यांच्या सह्या असलेली यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
यादीमध्ये २१ संचालकांमध्ये संस्थापक अध्यक्ष नानासाहेब तथा विदुरा विठोबा नवले, विद्यमान उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, ज्येष्ठ संचालक माऊली दाभाडे, चेतन भुजबळ, अनिल लोखंडे, आदी पाच संचालकांना पुन्हा संधी देण्यात आलेली असून, १६ नवीन चेहऱ्यांना यावेळी संचालक म्हणून संधी दिली आहे.
हिंजवडी- ताथवडे गट
विदुराजी विठोबा नवले
चेतन हुशार भुजबळ
दत्तात्रय गोपाळ जाधव
पौड - पिरंगुट गट
धैर्यशील रमेशचंद्र ढमाले
यशवंत सत्तू गायकवाड
दत्तात्रय शंकरराव उभे
तळेगाव- वडगाव गट
बापुसाहेब जयवंतराव भेगडे
ज्ञानेश्वर सावळेराम दाभाडे
संदीप ज्ञानेश्वर काशीद
सोमाटणे - पवनानगर गट
छबुराव रामचंद्र कडू
भरत मच्छिंद्र लिम्हण
उमेश बाळू बोडके
खेड- शिरूर हवेली गट
अनिल किसन लोखंडे
विलास रामचंद्र कातोरे
अतुल अरुण काळजे
धोंडिबा तुकाराम भोंडवे
महिला राखीव
ज्योती केशव अरगडे
शोभा गोरक्षनाथ वाघोले
अनुसूचित जाती / जमाती-
लक्ष्मण शंकर भालेराव
इतर मागासवर्ग-
राजेंद्र महादेव कुदळे
विमुक्त जाती/भटक्या जमाती -
शिवाजी हरिभाऊ कोळेकर
श्री संत तुकाराम कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी छाननीनंतर १९५ उमेदवारी अर्ज दाखल होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गठ्ठ्याने अर्ज आल्याने, रात्री उशिरापर्यंत उमेदवारी माघारी घेण्यात आलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू होती. कामकाज पूर्ण न झाल्याने बुधवारी (दि. २६) कामकाज पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीबाबत चित्र स्पष्ट होईल. - मुकुंद पवार, निवडणूक निर्णय अधिकारी