पिंपरीतील दुचाकीचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; जळगाव, मध्यप्रदेशातून वाहने केली जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 07:24 PM2021-07-27T19:24:46+5:302021-07-27T19:24:56+5:30
भोसरी पोलिसांची कामगिरी : एक कोटी एक लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपरी : शहरातून दुचाकी चोरून त्यांची खासगी ट्रॅव्हल्स बसमधून जळगाव येथे नेऊन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. जळगाव व मध्यप्रदेशातून चोरीच्या दुचाकी व ट्रॅव्हल्स बस असा एकूण एक कोटी एक लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भोसरी पोलिसांनी ही कामगिरी केली.
सुनील वामन महाजन (वय ५२, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), राजेश विश्वनाथ महाजन (वय ३८, रा. वाघोदा खुर्द, पो. सावदा, ता. रावेर, जि. जळगाव), सुपडू बोंदर ठाकणे (वय ३४, रा. केरळा बुद्रुक, ता. रावेर, जि. जळगाव), संतोष नामदेव महाजन (वय ३९, रा. कर्जोद, पो. वाघोड, ता. रावेर, जि. जळगाव), नीलेश जनार्धन ढगे (वय ३७, रा. आव्हा, ता. मोताळा, जि. बुलढाणा), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरी प्रकरणी भोसरी पोलिसांकडून तपास सुरू होता. सीसीटीव्ही फुूटेजमधील संशयित व्यक्ती पेट्रोल पंपाच्या मागे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुनील महाजन याला ताब्यात घेतले. त्याने पिंपरी, भोसरी, निगडी परिसरातून २२ दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. भोसरीत पार्क केलेल्या चोरीच्या १२ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. तसेच १० दुचाकी राजेश महाजन, सुपडू ठाकणे, संतोष महाजन, निलीेश ढगे यांना दिल्याचे सुनील महाजन याने सांगितले. त्यांच्याकडील दुचाकीही जप्त केल्या.
सुनील महाजन हा शहरातून दुचाकी चोरी करीत होता. ती दुचाकी खासगी ट्रॅव्हल्स बसमधून जळगाव येथे विक्रीसाठी पाठवित होता. त्यासाठी ट्रॅव्हल्स बसचे चालक व क्लिनर असलेले आरोपी मदत करीत. चोरीच्या दुचाकींची वाहतूक केल्याप्रकरणी देवांशी, संगीतम व स्वामीनारायण या नावाच्या तीन ट्रॅव्हल्स बस पोलिसांनी जप्त केल्या. भोसरी पोलीस ठाण्याकडील पाच, पिंपरी पोलीस ठाण्याकडील सात व निगडी पोलीस ठाण्याकडील दोन, असे एकूण १४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
दारूसाठी उच्चशिक्षिताने केला गुन्हा
ढगे व राजेश तसेच संतोष महाजन हे खासगी ट्रॅव्हल्स बसचे चालक आहेत. ठाकणे हा ट्रॅव्हल्स बसचा क्लिनर आहे. सुनील महाजन उच्चशिक्षित आहे. मात्र तो व्यसनाच्या आहारी गेला. दारुसाठी पैसे मिळावेत म्हणून त्याने दुचाकी चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले.