पिंपरी- चिचवडकरांनो काळजी घ्या! डेंग्यूच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ

By प्रकाश गायकर | Published: October 5, 2023 04:11 PM2023-10-05T16:11:09+5:302023-10-05T16:15:30+5:30

मागील आठवड्यामध्ये सलग झालेल्या पावसामुळे तापाच्या रुग्णांमध्ये देखील वाढ झाली आहे....

Pimpri- Chichwadkars be careful! The number of dengue patients is increasing | पिंपरी- चिचवडकरांनो काळजी घ्या! डेंग्यूच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ

पिंपरी- चिचवडकरांनो काळजी घ्या! डेंग्यूच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ

googlenewsNext

पिंपरी : शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या चार दिवसांमध्येच सहा जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मलेरियासदृष्य आजाराच्या रुग्णांमध्ये देखील वाढ होत असून चार दिवसांमध्ये २ हजार ३८ रुग्णांमध्ये तीव्र थंडीताप आहे. तसेच मागील आठवड्यामध्ये सलग झालेल्या पावसामुळे तापाच्या रुग्णांमध्ये देखील वाढ झाली आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जुलै महिन्यापासून आतापर्यंत १५४ जणांना डेंग्यची लागण झाली आहे. तर सहा जणांना मलेरिया झाला आहे. तसेच चिकनगुनियाने बाधित रुग्ण नसला तरी २३ रुग्णांमध्ये चिकनगुनियाची लक्षणे आढळली आहेत. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने वैद्यकीय सोयी-सुविधांवर ताण येत आहे. जुलै महिन्यामध्ये ३६, ऑगस्ट ५२, सप्टेंबर ६० व ऑक्टोबर महिन्याच्या चारच दिवसांमध्ये सहा जणांना डेंग्यू झाला आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.
तसेच घर परिसरामध्ये स्वच्छता ठेवावी. घरात पाणी साठविण्याची सर्व भांडी घासून कोरडी करायची आहेत, त्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरायचे आहे. घरातील मोठ्या टाक्या ज्या रिकाम्या करता येणे शक्य नाहीत त्यांना घट्ट झाकण बसवावे. घरातील फ्लॉवर पॉट, कुलर व फ्रिजचा खालच्या ट्रे मधील पाणी दर आठवड्यात रिकामे करावे. घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावावी असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

डास चावल्याने डेंग्यूचा आजार होतो. त्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच लक्षणे आढळल्यास तात्काळ मनपा दवाखाना व रुग्णालयामध्ये तपासणी करून घ्यावी. रुग्णालयामध्ये सर्व चाचण्या व उपचार अल्प दरात केले जातात.
- डॉ. अभयचंद्र दादेवार, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

Web Title: Pimpri- Chichwadkars be careful! The number of dengue patients is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.