पिंपरीत चोरट्यांचा धुमाकूळ; घरफोडी करून ६ लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 12:36 PM2021-10-12T12:36:56+5:302021-10-12T12:37:02+5:30
चोरट्यांनी दोन लॅपटॉप तसेच दागिने, रोकड, असा सहा लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
पिंपरी : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून घरफोडीचे तीन प्रकार उघडकीस आले आहेत. चोरट्यांनी दोन लॅपटॉप तसेच दागिने, रोकड, असा सहा लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी हिंजवडीत दोन तर सांगवी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला.
विनीत कुमार मल्ल (वय २५, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ११) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची खोली बंद असताना अज्ञात चोरट्याने बनावट चावीने लॉक खोलून खोलीत प्रवेश केला. खोलीतून फिर्यादीचा ३५ हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप चोरून नेला. रविवारी (दि. १०) रात्री साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान हा प्रकार घडला.
पुनम राजाभाऊ भिसे (वय २५, रा. जयराम नगर हिंजवडी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ११) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. लक्ष्मी व्यंकट मल्यालम (वय २३, रा. जयराम नगर, हिंजवडी), निकिता देशमुख (पूर्ण पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. निकिता देशमुख व पीजी मालकीण लक्ष्मी यांनी संगनमताने रविवारी (दि. १०) फिर्यादीच्या खोलीतून ३५ हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप चोरून नेला.
बारा तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला
अज्ञात चोरट्यांनी १२ तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारून चोरी केली. शिवशांत सुभाषराव जाधव (वय ३४, रा. गणेश नगर, नवी सांगवी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. १२) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नेताजी नगर, पिंपळे गुरव येथे शुक्रवार (दि. ८) ते सोमवार (दि. ११) या कालावधीत घरफोडीचा हा प्रकार घडला. फिर्यादीचे मामा ओंकार भालकेश्वर यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून १२ तोळे चार ग्रॅमचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा एकूण पाच लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.