ऑडी चालकाची गुंडगिरी! बाईकस्वाराला धडक देत बोनेटवर ३ किमीपर्यंत फरफटत नेलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 11:41 AM2024-12-04T11:41:54+5:302024-12-04T11:44:41+5:30
पिंपरी चिंचवडमध्ये एका ऑडी कारचालकाने तरुणाला धडक देत त्याला फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
Pimpri Chinchwad Crime : पुणे पोर्शे कार अपघातानंतर आणखी एक धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे. पिंपरी चिंचवाड येथे एका ऑडी कारचालकाने बाईकस्वाराला धडक देऊन त्याला फरफटत नेलं आहे. कारचालकाने बोनेटवर पडलेल्या तरुणाला २-३ किमी फरफरट नेलं आहे. हा सगळा प्रकार एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या प्रकरणामळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बाईकवरुन जाताना कारचा धक्का लागल्याने झालेल्या वादानंतर ऑडी कारचालकाने तरुणाच्या अंगावर गाडी घातली. त्यामुळे बोनेटवर पडलेल्या तरुणाला ऑडी कारचालकाने तब्बल दोन ते तीन किलोमीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक घडना घडली आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
आकुर्डीतील के टी एम शोरुम ते चिंचवडमधील बिजलीनगर दरम्यान रविवारी रात्री पावणेदहा वाजता हा सगळा प्रकार घडला. १ डिसेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात पीडित तरुण चालत्या कारच्या बोनेटला लटकलेला दिसत आहे. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जेकेरिया व त्यांचा मित्र हे बाईकवरुन जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून भरधाव आलेल्या पांढर्या रंगाच्या ऑडी कारने धडक दिली. तेव्हा त्यांनी कारचालकाला धक्का का दिला असे विचारले. तेव्हा कमलेश व त्याच्या साथीदारांनी जेकेरिया आणि त्याचा मित्र अनिकेत यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर कमलेश व हेमंत यांनी तुला आज जिवंत सोडत नाही, असं म्हणत जेकेरियाच्या अंगावर कार घातली. त्यामुळे जेकेरिया गाडीच्या बोनेटवर पडला. तरीही कमलेश याने कार भरधाव वेगाने चालवत आकुर्डी रेल्वे स्टेशन येथून संभाजी चौक, मंगल मेडिकल बिजलीनगर येथे आणली. त्यानतंर कारमधील महिलेला उतरण्यासाठी त्यांनी कार थांबविली. त्यावेळी जेकेरियासुद्धा कारच्या बोनेटवरुन खाली उतरला. त्यानंतर आरोपी पळून गेले.
जेकेरिया जेकब मैय्थू (वय २३, रा. आण्णाभाऊ साठेनगर वसाहत, भक्ती शक्ती चौक, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कारचालक कमलेश ऊर्फ अशोक पाटील, हेमंत चंद्रकांत म्हाळसकर ऊर्फ सोन्या, प्रथमेश पुष्कर दराडे या तिघांना अटक केली आहे.