पिंपरी- चिंचवड भाजपला चौथा आमदार! गटा-तटाला थारा न देता अमित गोरखे यांना संधी
By विश्वास मोरे | Published: July 1, 2024 05:08 PM2024-07-01T17:08:45+5:302024-07-01T17:09:43+5:30
''महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणत्याही पक्षाने विधानपरिषद किंवा राज्यसभेवर संधी दिली नाही. भाजपने प्रथमच मातंग समाजाला प्रतिनिधींत्व दिले''
पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरात भाजपात भोसरी विरुद्ध चिंचवड युद्ध, कुरघोडण्याचे राजकारण सुरु असते. त्यामुळे पिंपरी विधानसभेतील नेत्यांवर अन्याय होत आहे. भाजपातील स्थनिक पातळीवरील गटा-तटास फाटा देऊन भाजपचे सचिव अमित गोरखे यांना संधी दिली आहे. पिंपरी- चिंचवड शहर परिसरामध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. चिंचवडमधून भाजपचे अश्विनी जगताप, भोसरीमधून महेश लांडगे तर विधान परिषदेतून उमा खापरे यांना संधी मिळाली आहे.
महापालिकेची सूत्र आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्याकडे आल्यानंतर पिंपरी विधानसभेतील नेतृत्वाला संधी मिळत नव्हती, तशी मागणी आणि तक्रारी केल्या जात होत्या. दोन नेत्यांच्या गटातटाच्या फटका पिंपरीला बसत होता. त्यावेळी सन २०१८ मध्ये स्थानिक नेत्यांना डावलून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी गोरखे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे सर्व मंडळे बरखास्त झाली. सन २०२२ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार आले. त्यानंतर माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. त्यानंतर विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपने पिंपरीतून अमित गोरखे यांना संधी दिली आहे.
अमित गोरखे यांची वाटचाल !
अमित गोरखे यांनी राजकारण, समाजकारण, शिक्षण, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये इतका सर्वसामान्य कुटुंब तरुणांनी भरारी घेतली आहे. गोरखे हे पिंपरी- चिंचवडमधील रहिवासी असून, त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विभागातून एमए, ह्युमन रिसर्चमधून एमबीए पूर्ण केले आहे. त्याचबरोबर सध्या भाजपचे राज्यसचिव म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, नोव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष, कलारंग सांस्कृतिक कला संस्थेचे अध्यक्ष, नाम फाउंडेशनचे समन्वयक अशी विविध पदे भूषवलेले आहेत. त्याचबरोबर २०११ मध्ये जाहीर केलेल्या नॅशनल युथ अवार्डचे ते मानकरी आहेत. शिक्षण रत्न पुरस्कार, महाराष्ट्र राज्य युवा धोरण ठरवण्यासाठी सदस्य, महाराष्ट्र शासन युवा संचालनाचा पुरस्कार मिळालेला आहे.
अमित गोरखे म्हणाले, 'भाजपने मला विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्याबद्दल धन्यवाद. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील या नेत्यांमुळे वंचित दलित समाजाला न्याय देण्यासाठी मला संधी दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणत्याही पक्षाने विधानपरिषद किंवा राज्यसभेवर संधी दिली नाही. भाजपने प्रथमच मातंग समाजाला प्रतिनिधींत्व दिले आहे. निश्चितच या संधीचे मी सोने करेल.