पिंपरी-चिंचवड शहर, मावळात बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 02:59 AM2018-01-04T02:59:24+5:302018-01-04T02:59:36+5:30
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पिंपरी-चिंचवड शहर परिसर आणि मावळ तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला.
पिंपरी : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पिंपरी-चिंचवड शहर परिसर आणि मावळ तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. दगडफेक, वाहनांच्या तोडफोडीचे काही प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला. अनेक ठिकाणी रस्ता रोको करण्यात आले.
भोसरीत तणावपूर्व शांतता
भोसरी परिसरात तणावपूर्ण शांततेत बंद पाळण्यात आला. चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. दुकाने, हॉटेल, खासगी वाहतूक व्यवस्था सकाळपासून स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुटी देण्यात आली होती. नेहमी गजबजलेल्या पीएमटी चौक, भोसरी-आळंदी रोड, भोसरी-दिघी रोड, लांडेवाडी चौक, मॅगझिन चौक, टेल्को रस्ता या ठिकाणी शुकशुकाट पसरला होता. बहुसंख्य कामगारांनी सुटी घेणे पसंत केले. त्यामुळे औद्योगिक परिसरातील कामकाजावरही बंदचा परिणाम जाणवला. सकाळीच दलित संघटनांनी भोसरी परिसरात फेरी काढून दुकानांना बंदचे आवाहन केले. किरकोळ वादावादीचे प्रकारही घडले. यानंतर या संघटनांच्या वतीने भोसरी गावठाण परिसरात दुचाकी रॅली काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर औद्योगिक परिसरात रॅलीद्वारे बंदचे आवाहन करण्यात आले.
रहाटणीत निषेध मोर्चा शांततेत
रहाटणी : विविध सामाजिक संघटना व भीम सैनिक आणि राहुल मित्र मंडळ व सारनाथ बुद्ध विहार व परिसरातील अनेक कार्यकर्ते एकत्रित आले. रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात काढलेल्या निषेध मोर्चा शांततेत पार पडला. त्यास स्थानिक व्यापाºयांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़ रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात अगदी सकाळपासूनच सर्वत्र व्यापाºयांनी बंद पाळण्यात आला. सकाळी रहाटणी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. कोकणे चौक, शिवार चौक, कुणाल आयकॉन रस्ता, गोविंद यशदा चौक, गंगा पार्क चौक, पिंपळे सौदागर गावठाण पुन्हा रहाटणी चौकातील सारनाथ बुद्ध विहाराजवळ निषेध मोर्चाची सांगता करण्यात आली.
थेरगावमध्ये शुकशुकाट
थेरगाव : थेरगावमधील प्रमुख असलेल्या डांगे चौक, सोळा नंबर या बाजारपेठांसह अंतर्गत व रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. डांगे चौक या ठिकाणी भीमप्रेमींनी निषेध व घोषणाबाजी केली. तुरळक वर्दळ वगळता थेरगावमध्ये बंद पाळण्यात आला. स्कूल बसही बंदच होत्या. तर अनेक ठिकाणी सकाळ विभागातील शाळांमध्ये अत्यल्प विद्यार्थी आले होते, तर काही शाळांना सुट्या देण्यात आल्या.
चिंचवडमधील दुकाने बंद
चिंचवड : येथील बहुतांश दुकाने बंद ठेवण्यात आली होती. चिंचवडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बहुतांश भागात तणावपूर्ण शांतता असल्याचे दिसत होते. वेताळनगर, दळवीनगर, लिंक रोड, आनंदनगर या भागात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता. जमावाचे काही गट तोडफोड करीत असल्याचा बातम्या परिसरात पसरल्याने बहुतांश भागातील दुकाने व्यापाºयांनी बंद ठेवली होती.
सांगवी परिसरात दुकाने बंद
सांगवी : जुनी सांगवी, गणेश चौक, शितोळेनगर, नवी सांगवीतील मेन रोड, साई चौक, काटेपुरम् चौक भागातील दुकाने बंद होती.
वाल्हेकरवाडीत बंदोबस्त
रावेत : बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा चौक, चिंतामणी चौक, ओम चौक, छत्रपती शिवाजी चौक, बळवंतनगर परिसर, चिंचवडेनगर,आकुर्डी रेल्वे स्टेशन, भोंडवे कॉर्नर आदी भागातील व्यापाºयांनी दुकान बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
|
सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र
पवनानगर : पवनानगर चौक येथे संपुर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आला होता. पवनानगर चौकामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन घोषणा देत घटनेचानिषेध व्यक्त केला व बंदला पाठिंबा दिला.
थेरगाव : हातगाड्यांची तोडफोड
वाकड : हिंजवडी, मारुंजी, थेरगाव, वाकड, ताथवडे परिसरासह संपूर्ण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळपासूनच सर्वत्र बंद पाळण्यात आल्याने शुकशुकाट होता. सकाळी वाकड चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. पोलीस बंदोबस्तात शेडगे वस्ती, मानकर चौक, कस्पटे वस्ती, काळेवाडी फाटा, सोळा नंबर, गुजरनगर, डांगे चौक, वाकड रस्ता, म्हातोबानगर, वाकड गावठाण रस्त्याने विराट मोर्चा घोषणा देत गेला. दरम्यान, साईनाथनगर, थेरगाव येथे दुकाने व हातगाड्यांची जमावाकडून तोडफोड करण्यात आली. याबाबत वाकड ठाण्यात काही काळ तणाव होता. वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांना आंदोलनकांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.
मोशी : येथे सकाळी लक्ष्मीनगर येथून मोर्चास सुरुवात झाली. मोशी मुख्य चौकातून देहू फाटा चौक, भारत माता चौकातून पुणे-नाशिक रस्त्यावरून पुन्हा मुख्य चौकात मोर्चा आला होता. काही काळ आंदोलकांनी पुणे-नाशिक महामार्ग बंद केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दगडफेक प्रकरणी दहा जणांना अटक
देहूगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला देहूगाव येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. दगडफेक प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली.
मंगळवारी देहूगाव येथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास समाजकंटकांनी काही वाहने, दुकाने आणि हॉटेल, एटीएमची तोडफोड केली होती. यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, ग्रामस्थांनी पोलिसांच्या शांततेच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. बुधवारी सकाळपासून ग्रामपंचायत चौकातील व ज्या दुकानांची तोडफोड झाली होती, ती दुकाने उघडी होती. काही दुकानदारांनी सावधगिरी म्हणून दुकान बंद ठेवले होते.
दिवसभर पोलीस बंदोबस्त होता. बंद शांततेत पाळला गेला. देहूरोड स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील सचिन गायकवाड, मयूर भालेराव, आशिष चव्हाण, साहिल चव्हाण, प्रतीक पालवे, अशोक घोलप, आकाश जाधव, कृष्णा कुºहाडे, निखिल चव्हाण, शुभम चोपडे (सर्व रा. देहूगाव) या १० जणांना अटक केली आहे. आणखी तीन जणांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तळेगावला रोखला महामार्ग
तळेगाव दाभाडे : येथील आंबेडकरी चळवळीतील तसेच विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोचार्ला प्रतिसाद देत तळेगाव शहर परिसरात कडाडीत बंद पाळण्यात आला. निषेध मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सकाळी तळेगाव स्टेशन चौक येथे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मिलिंद एकबोटे, भिडे गुरुजी यांना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी प्रमुख वक्त्यांनी निषेध सभेत केली. त्या नंतर कार्यकर्त्यांनी रॅली काढली. मोर्चेकरांनी तळेगाव फाटा येथे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग सुमारे तासभर रोखून धरला.
पीएमपीएमएल बस आणि मालमोटारीवर दगडफेक करण्यात आली. निरीक्षक प्रदीप काळे आणि पोलिसांनी कार्यकत्यार्ना रोखण्याचा प्रयत्न केला. सुमारे अर्ध्या तासानंतर मोचार्ने वडगाव मावळकडे व द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे कूच केले. पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांच्या सह स्थानिक पोलीस, वाहतूक नियंत्रक आणि विशेष बंदोबस्तासाठी जादा कुमक तैनात करण्यात आली होती.
लोणावळ्यात दुचाकी रॅली
लोणावळा : बंदला लोणावळेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ व सर्व लहान मोठे व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. बाजारपेठ, गवळीवाडा, नांगरगाव, खंडाळा, भांगरवाडी आदी सर्व भागांमध्ये बंद पाळण्यात आला. लोणावळा शहर व आजूबाजूच्या भागातील विविध संघटनांनी शिवाजी चौकात एकत्र येऊन दुचाकी रॅली काढली.
सोमाटणे परिसरातील रस्त्यावर शुकशुकाट
४शिरगाव : सोमाटणे फाटा व परिसरातील गावांमध्ये शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. सोमाटणे येथे निघालेल्या निषेध मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सकाळपासून येथील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. काही हॉटेलचालकांनी हॉटेल चालू ठेवली होती़ परंतु भीमसैनिकांनी ती बंद करण्याचे आवाहन केले. दिवसभर रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. उर्से येथे शेकडो कार्यकर्त्यांनी एक तास टोल वसुली थांबविण्यात आली होती. काहींनी रस्त्यात टायर जाळून निषेध व्यक्त करत दगडफेक केली. यात काही वाहनांच्या काचा फुटल्या.
कामशेतमध्ये शांततेत बंद
४कामशेत : शहरातील व्यापाºयांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) मावळ तालुका यांच्या वतीने कामशेत बंदचे निवेदन पोलीस ठाण्यात देण्यात आले होते. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. दुपारी दोनच्या सुमारास देहूरोड ते लोणावळा रॅलीस स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व भारिपा बहुजन महासंघाच्या वतीने सुरुवात करण्यात आली. कामशेत पोलीस ठाणे येथून ते पंडित नेहरू विद्यालय या मार्गावर रॅलीचे आयोजन करण्यात आले.