पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणाच्या विळख्यात, महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 03:28 AM2018-01-30T03:28:50+5:302018-01-30T03:29:02+5:30

Pimpri-Chinchwad city pollution | पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणाच्या विळख्यात, महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणाच्या विळख्यात, महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

googlenewsNext

मोशी : महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्यामुळे मोशी, कुदळवाडी, चिखली, तळवडे, मोशी परिसरात अनधिकृत भंगार व्यवसाय फोफावला आहे. तिथे जाळल्या जाणा-या कच-यामुळे पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. त्याचा नाहक परिणाम सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, पवित्र इंद्रायणी नदीचे प्रदूषण वाढण्यास देखील कारणीभूत ठरत आहे. याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.
चिखली, कुदळवाडी भागात कचरा आणल्यानंतर लगेचच पेटवला जातो. सर्व परिसर धुराने माखतो. उपयोगात न येणारा कचरा आणि प्लॅस्टिकचे ढिगारे मिळेल तिथे टाकून पेटविले जातात. रात्री केबल जाळून तांबे मिळविले जाते. केबल पेटविल्याने मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होते. लोखंड व वेगवेगळे धातू वितळवल्याने सूक्ष्म कण, धूर व धुळीचे ढग दाटतात. तेलाने माखलेले पिंप रसायनांनी धुतले जातात. त्यामुळे धुराचे लोट पसरत असून त्याचा मोशी, बोºहाडेवाडी ,देहूरस्ता परिसरापर्यंत त्याची तीव्रता जाणवते.रसायनमिश्रित कचºयामुळे कार्बन मोनाक्साईड, सल्फर आॅक्साईड, कार्बन डायआॅक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड, हायड्रोजन डायआॅक्साईड, सायनाईड असे अतिविषारी वायू हवेत मिसळतात. त्यामुळे घसा व फुफ्फुसाचे आजार होतात. तसेच वर्षभरात कुदळवाडी, चिखली परिसरात किमान १५ ते १७ वेळा मोठी आग लागल्याची नोंद अग्निशामक दलाकडे आहे. अनेकदा दोन-दोन दिवस आग विझवावी लागते. मात्र, अशी आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अग्निशामक दलाला सापडलेले नाही.
मोशी, चिखली परिसरात इंद्रायणी नदीत आजपर्यंत अनेक वेळा मासे मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामुळे नदी प्रदूषणाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. याच इंद्रायणी नदीचे पाणी पुढे आळंदीमध्ये भाविक भक्तांकडून पवित्र जल म्हणून प्राशन केले जात आहे. असे असतानाही त्याबाबत कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
नगरसेविका सारिका बोºहाडे म्हणाल्या, ‘‘या विषयावर आयुक्त, आमदार यांच्याशी चर्चा केली असून, रसायनमिश्रित पाणी नदीत सोडणाºया कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी जबाबदारी पार पाडावी.’’

महापालिकेकडून नोटीस
महापालिकेने दोन वर्षांपूर्वी कुदळवाडी-मोशी परिसरात सर्वेक्षण केले. पंधराशे पेक्षा अधिक भंगार मालाची गोदामे आढळली. त्यातील ९५ टक्के अनधिकृत आहेत. पालिकेने केवळ नोटीस दिली. दुकानचालक, मालकांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अखत्यारितील विषय असल्याने त्यांनीच नियंत्रण ठेवावे, अशी महापालिकेच्या अधिकाºयांची भूमिका आहे.

कारवाई करणे आवश्यक
प्रदूषण करणारे उद्योग व कंपन्यांवर कारवाई केली जाते. नोटीस दिली जाते. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत भंगार मालाची गोदामे व इतर दुकानांवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. त्यांना वीज, पाणी यासाठी ना हरकत प्रमाणपत्र महापालिकेने देऊ नयेत. भंगार मालासारखे अनधिकृत व्यवसाय थाटण्याचा प्रयत्न झाल्यास लगेच त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. चिखली-मोशी परिसरात सध्या नदीलगत मोठ-मोठ्या कंपन्यांचे जाळे निर्माण झाले आहे. परंतु अशा औद्योगिक कंपन्यांमधून बाहेर निघणारे रसायनमिश्रित पाणी बहुसंख्य कंपन्या थेट इंद्रायणी नदीत सोडतात.

Web Title: Pimpri-Chinchwad city pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.