Pimpri Chinchwad Crime: सांगवीतील ‘तो’ खून टोळीयुद्धातून; पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात

By नारायण बडगुजर | Published: May 30, 2024 07:22 PM2024-05-30T19:22:41+5:302024-05-30T19:24:20+5:30

वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार करून खून केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली होती....

Pimpri Chinchwad Crime: 'That' Murder in Sangvi from Gang War; The police took the suspect into custody | Pimpri Chinchwad Crime: सांगवीतील ‘तो’ खून टोळीयुद्धातून; पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात

Pimpri Chinchwad Crime: सांगवीतील ‘तो’ खून टोळीयुद्धातून; पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात

पिंपरी : सांगवीतील खून प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे तपास सुरू या प्रकरणाला टोळीयुद्धाची किनार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. 

दीपक दत्तात्रय कदम (३५, रा. जुनी सांगवी), असे खून झालेल्याचे नाव आहे. सुनील बजरंग शिस्तारे (३९, रा. पिंपळे गुरव, मूळगाव जांबूत, ता. शिरुर, पुणे) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. ३०) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमन गिल आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक कदम हा बुधवारी (दि. २९) रात्री पावणेदहाच्या सुमारास सांगवी येथील माहेश्वरी चौकात होता. त्यावेळी अमन गिल आणि त्याचा साथीदार तेथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून पूर्व वैमनस्यातून व सूड भावनेतून दीपक याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर अमन गिल आणि त्याचा साथीदार पसार झाले. 

वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार करून खून केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली. सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कदम याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सांगवी पोलिस तसेच गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू आहे. संशयितांच्या मागावर पथके रवाना झाली असून याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. खुनाचे नेमके कारण काय, मुख्य सुत्रधार कोण, याचा पोलिस शोध घेत आहेत. 

योगेश जगताप खून प्रकरणाशी संबंध?

पिंपळे गुरव येथे १८ डिसेंबर २०२१ रोजी योगेश जगताप याच्यावर भरदिवसा गोळीबार करून खून झाला होता. ढमाले टोळीने हा खून केल्याचे तपासातून समोर आले होते. दरम्यान वाकड येथे काही महिन्यांपूर्वी रेहान शेख याची हत्या करण्यात आली. यात यात ढमाले टोळीचा हात असल्याचा संशय आहे. ढमाले टोळी सोबत दीपक कदम असायचा त्यामुळे त्याचा देखील रेहानच्या हत्येत सहभाग असल्याच्या संशयावरून रेहान शेख टोळीच्या सदस्यांनी हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या सर्व घटनेचा योगेश जगताप याच्या हत्येशी काही संबंध आहे का?. याचा देखील पोलिस तपास करत आहेत.  

खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा होता दाखल

प्राणघातक हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी २०१४ मध्ये ढमाले टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपींमध्ये दीपक कदम याचे देखील नाव होते. त्यानंतर दीपक कदम हा त्याचा व्यवसाय करत होता. मात्र, तो ढमाले टोळीच्या संपर्कात असल्याचा संशय घेत त्याचा खून करण्यात आला, असा अंदाज व्यक्त करीत त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Pimpri Chinchwad Crime: 'That' Murder in Sangvi from Gang War; The police took the suspect into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.