पिंपरी - चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे ‘भिक मांगो’ आंदोलन; शहरातील पे अँड पार्क पाॅलिसीचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 07:01 PM2021-07-15T19:01:57+5:302021-07-15T19:02:06+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निषेध आंदोलन करून पे अँड पार्क या धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या
पिंपरी: महापालिकेकडून शहरात अँड पार्क पाॅलिसी लागू करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे पिंपरीत भिक मांगो आंदोलन करण्यात आले. महापालिका भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुरुवारी आंदोलकांनी धडक देत निदर्शने केली.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निषेध आंदोलन करून पे अँड पार्क या धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सिग्नलवर भिक मांगो आंदोलन केले. त्यानंतर आंदोलकांनी थेट महापालिका प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक देत निदर्शने केली.
वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. पक्षाचे शहर कार्याध्यक्ष अंकुश कानडी, संजीवन कांबळे, महासचिव राजन नायर, राहुल सोनवणे, प्रवक्ता के. डी. वाघमारे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
देवेंद्र तायडे म्हणाले, पे अँड पार्क पाॅलिसी रद्द करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली. त्याबाबत आठवडा भरापूर्वी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. वाहन खरेदी करताना आरटीओच्या माध्यमातून रोड टॅक्स घेतला जातो. मिळकत करामध्ये देखील रस्ता सेवा कर घेतला जात असताना पे अँड पार्क धोरणाचा अट्टाहास कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.