पिंपरी चिंचवड : डोक्यात गोळी झाडून अभियंत्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 12:43 PM2018-04-02T12:43:49+5:302018-04-02T12:43:49+5:30
वाकड येथील ऱ्हिदम सोसायटीत राहणाऱ्या आयटी अभियंत्याने राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.
पिंपरी चिंचवड - वाकड येथील ऱ्हिदम सोसायटीत राहणाऱ्या आयटी अभियंत्याने राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. आनंद बळवंत वासुदेव यादव (वय 35 वर्ष) असे आत्महत्या करणा-या अभियंत्याचं नाव आहे. ही घटना सोमवारी (2 एप्रिल) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऱ्हिदम सोसाटीत सदनिका क्रमांक 503 मध्ये आनंद यादव रहात होते. राहत्या घरातच त्यांनी स्वतः डोक्यात गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. नैराश्येपोटी आयुष्य संपवत असल्याचे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे. गुड फ्राय डेच्या सुट्टीच्या दिवशी आनंद मुंबईला जाऊन आले होते. यानंतर पिंपरी चिंचवड येथे आल्यावर त्यांनी आत्महत्या केली आहे.
2015 ते 2017 या कालावधीत आनंद हैदराबाद, मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान अभियंता पदावर कार्यरत होते. गत वर्षी ते नोकरीनिमित्ताने पुण्यात आला होते. दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण काय असावे?, याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.