पिंपरी चिंचवडमध्ये वाहन भाड्याने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 06:58 PM2021-06-02T18:58:24+5:302021-06-02T18:59:50+5:30
सहा जणांना बेड्या ठोकल्या, पोलिसांनी जप्त केल्या एक कोटी २० लाखांच्या १६ चारचाकी
पिंपरी: चारचाकी वाहन भाड्याने देण्याचे आमिष दाखवत त्याचा करार करून परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून एक कोटी २० लाख २० हजार रुपयांची १६ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
कल्पेश अनिल पंगेकर (वय ३३, रा. नवी खडकी, येरवडा), नमण सहाणी (वय ३९, रा. लोहगाव, पुणे), सनी भाऊसाहेब कांबळे (वय २७, रा. खडकी), संदीप ज्ञानेश्वर गुंजाळ (वय ३७), हितेश ईश्वर चंडालीया (वय २७), रोनित मधुकर कदम (वय २८, तिघेही रा. येरवडा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन भाड्याने देण्याचे आमिष दाखवून त्याबाबत करार करून आरोपी फसवणूक करत होते. याप्रकरणी सुनील नामदेव राखपसरे (रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींच्या विरोधात १९ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. चिंचवड पोलिसांनी तपास केला असता आरोपींनी १६ चारचाकी वाहने अशाच प्रकारे भाड्याने देण्याचे आमिष दाखवून करार करून मूळ मालकांची फसवणूक केली. तसेच ती वाहने परस्पर विक्री केली.
सदरच्या वाहन मालकांशी बोलून व्यवहार पूर्ण करून घेऊ, असे सांगून आरोपी वाहनांची विक्री करत होते. आणि वाहन खरेदी करणाऱ्या लोकांना खोटी माहिती देऊन त्यांचीही फसवणूक करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.