Pimpri Chinchwad: ताथवडेत गॅस सिलेंडरचा स्फोट, टेम्पोसह तीन स्कूल बस जळून खाक
By नारायण बडगुजर | Published: October 9, 2023 09:22 AM2023-10-09T09:22:07+5:302023-10-09T09:22:41+5:30
मुंबई- बेंगळुरू महामार्गावर ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घटना घडली. ...
पिंपरी : गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. सलग तीन ते चार स्फोट झाल्याने परिसरातील सोसायट्यांमधील नागरिक प्रचंड घाबरले. स्फोटामुळे आगीचे लोळ आणि धुराचे लोट उठले. यात टेम्पो सह तीन स्कूल बस जळून खाक झाल्या. मुंबई- बेंगळुरू महामार्गावर ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घटना घडली.
पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जेएसपीएम महाविद्यालयाजवळील मोकळ्या जागेत गॅस सिलेंडर असलेला एक टेम्पो होता. त्यावेळी काही सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे तेथील तीन स्कूल बसने पेट घेतला. तसेच टेम्पो ही खाक झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
पोलिस उपायुक्त शिवाजी पवार, साहेब आयुक्त विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी घटनास्थळी गाव घेतली. दरम्यान परिसरातील सोसायट्यांमधील लहान मुले व महिलांमध्ये स्फोटाच्या आवाजाने घबराट पसरली. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
गॅस चोरी करताना स्फोट -
एलपीजीचा घटक असलेल्या प्रोपेलीन गॅसचा 21 टन क्षमता असलेला टँकर घटनास्थळाजवळ आढळून आला. या टँकरमधून सिलेंडरमध्ये गॅस भरत असताना अचानक आग लागली असावी आणि त्यामुळे सिलेंडरचे स्फोट झाले, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी दिली.