Pimpri chinchwad Lock down 2.0 : औद्योगिकनगरीत सोमवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 01:27 PM2020-07-11T13:27:01+5:302020-07-11T13:27:16+5:30
कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने दहा दिवसांसाठी लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. ‘‘कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. सोमवारी दि.१२ जुलै मध्यरात्रीपासून ते २३ जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. या कालावधीत कारखाने, दुकाने सर्वच बंद असणार आहे. केवळ दूध आणि मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात जुलैच्या पहिल्या दिवसापासून कोरोना मोठ्याप्रमाणावर वाढ आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीकडून केली जात होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत.
श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख वाढत आहे. रुग्णवाढीचे उच्चाक होत आहेत. शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. मागील पाच दिवसात नवीन दोन हजार रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातच जुलैअखेरपर्यंत दहा हजार रुग्ण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये, लॉकडाऊनचे पालन करावे, कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी मदत करावी.’’
लॉकडाऊन कशासाठी?
१) कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही शहरात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. अनेक नागरिक मास्क न वापरता फिरत आहेत. त्यामुळे कडक लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे.
२) सोमवार मध्यरात्रीपासून पुढचे दहा दिवस लॉकडाउन असणार आहे. २३ जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या कालावधीत कारखाने, दुकाने सर्वच बंद असणार आहे.
३) औद्योगिकनगरीतील केवळ दूध आणि मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत. याबाबत सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे.