पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभापतींसाठी चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 03:12 AM2018-04-06T03:12:51+5:302018-04-06T03:12:51+5:30
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांची मुदत एप्रिलअखेरीस संपुष्टात येणार असून, त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. विविध समितींवर सभापतिपदी वर्णी लागावी, यासाठी भाजपाच्या नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांची मुदत एप्रिलअखेरीस संपुष्टात येणार असून, त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. विविध समितींवर सभापतिपदी वर्णी लागावी, यासाठी भाजपाच्या नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्व समित्यांवर भाजपाचे वर्चस्व असल्याने सभापती सत्तारूढ पक्षाचेच होणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर, पक्षनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष ही महत्त्वाची पदे आहे. त्या पाठोपाठ विधी समिती, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती, महिला व बाल कल्याण समिती आणि शहर सुधारणा समिती, जैवविविधता समिती अशा पाच प्रमुख समित्या आहेत. विधी समिती सभापतिपदी शारदा सोनवणे, कला-क्रीडा-समिती अध्यक्षपदी लक्ष्मण सस्ते, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतिपदी सुनीता तापकीर, शहर सुधारणा समिती सभापतिपदी
सागर गवळी, जैवविविधता समिती अध्यक्षपदी उषा मुंढे या आहेत. पाचही समिती सदस्यांची
मुदत एप्रिलअखेरला संपणार आहे. त्यामुळे नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे.
विधी समितीत नऊ, जैवविविधता समितीत सात, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा समितीवर प्रत्येकी नऊ सदस्य आहेत. पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य प्रत्येक समितीत जाणार आहे. त्यामुळे काही पक्षांनी इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत.
नेत्यांचे उंबरे झिजविणे सुरू
स्थायी समिती, महापौर आणि उपमहापौर, पक्षनेते आदी पदांवर संधी न मिळालेल्यांसाठी विषय समिती सभापती हे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे त्यावर संधी मिळावी, यासाठी नगरसेवकांनी चिंचवड, पिंपरी, भोसरीतील भाजपाच्या नेत्यांकडे प्रयत्न सुरू केले आहेत. नगरसेवक नेत्यांचे उंबरे झिजवीत आहेत. सर्व समित्यांवर वर्चस्व असल्याने सभापती भाजपाचेच होणार आहेत. समितीवर आमदार महेश लांडगे किंवा आमदार लक्ष्मण जगताप या गटांपैकी कोणाची वर्णी लागते, याविषयी चर्चा आहे.