पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नावाने मेसेज व्हायरल केल्याने गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 03:24 PM2020-03-25T15:24:43+5:302020-03-25T15:53:15+5:30
कारोना संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नावे अनावट मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकावर पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी : कारोना संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नावे अनावट मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी येथे शनिवारी (दि. २१) ही घटना घडली. याप्रकरणी एकावर पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक एस. वाघ (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी –चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त अण्णा यशवंत बोदडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिंसानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाघ याने त्याच्या फेसबुक अकाउंटवर महापालिका आयुक्त यांच्या नावाने मेसेज पोस्ट केला. महापालिका आयुक्तांची परवानगी न घेता चुकीचा मेसेज व्हायरल करून कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाबाबत लोकांच्या मनात घबराट निर्माण केली. तसेच महापालिकेची बदनामी देखील केली.
नमस्कार मी तुम्हाला विनंती करतो की, आज रात्री १० ते उद्या सकाळी पाचपर्यंत आपले घर सोडू नका. कावीड – १९ मारण्यासाठी औषधांची हवेत फवारणी होणार असल्याने आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना आणि आपल्या कुटुंबाला ही माहिती सामाईक करा, असे आरोपी याने व्हायरल केलेल्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे.