पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपा कारभार शिवसेनेकडून लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 08:22 PM2017-09-16T20:22:27+5:302017-09-16T20:22:27+5:30
लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन भारतीय जनता पक्षाने पक्षविस्तारक योजना सुरू केली आहे. त्यातून पक्षसंघटना बळकट करण्यावर भर दिला जात आहे. भाजपा विकास कामे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, तर शिवसेना चुकीच्या कामांवर आक्षेप घेत आहे.
विश्वास मोरे
पिंपरी, दि. 16 - लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन भारतीय जनता पक्षाने पक्षविस्तारक योजना सुरू केली आहे. त्यातून पक्षसंघटना बळकट करण्यावर भर दिला जात आहे. भाजपा विकास कामे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, तर शिवसेना चुकीच्या कामांवर आक्षेप घेत आहे. केंद्रातील प्रश्नांवर पाठपुरावा करणाºया मावळ आणि शिरूर मधील खासदारांनी महापालिकेत लक्ष घातले असून भाजपा कारभारास लक्ष्य करणार असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीत भाजपाला एकहाती सत्ता मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रस, शिवसेना, मनसेला धोबीपछाड दिले. कामे करूनही राष्ट्रवादी काँग्रेसला अभूतपूर्व अपयशाला सामोरे जावे लागले. तर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार असतानाही महापालिकेतील संख्याबळ १४ वरून ९ झाले. महापालिका निवडणूकीनंतर आता भाजपाने लोकसभा निवडणूकीची तयारी केली आहे. मावळ आणि शिरूर मतदार संघांसाठी तयारी सुरू केली आहे.
तर ज्या प्रभागात भाजपाचे नगरसेवक नाहीत, त्याठिकाणी प्रभागात, वॉर्डात, बुथनिहाय पक्षविस्तारकांच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. पक्षाची ध्येयधोरणे पोहोचविण्याबरोबरच योजनांचा माहिती देण्यात येत आहे. तसेच भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरातील विविध प्रश्नाबाबत लक्ष घातले आहे. महापालिका अधिकारी आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अधिकारी यांची बैठक घेऊन चर्चा केली आहे. तसेच कामचुकार अधिकाºयांना धारेवर धरण्याचे काम सुरू केले आहे.
भाजपाने लोकसभा निवडणूकीसाठी तयारी सुरू केल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई येथे नुकतीच बैठक झाली. शिवसेना पदाधिकाºयांच्या बैठकीत पक्ष संघटनात्मक बदलांचे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले होते. तसेच लोकसभा निवडणूकीची तयारी करा, बुथनिहाय नियोजन करा, असे संकेतही दिले आहेत. दरम्यान शिवसेनेच्या पक्ष कामासाठी वेळ मिळत नसल्याने संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी काम करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, उपनेत्या डॉ. नीलम गोºहे यांनी शहराच्या राजकारणात लक्ष घातल्याचे दिसून येत आहे.
भाजपा, शिवसेना नेते सक्रिय
पंधरा दिवसांपूर्वी डॉ. गोºहे यांनी महापालिकेतील विविध प्रश्नाबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी खासदार आढळराव पाटील यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील अधिकाºयांसमवेत चर्चा केली. आयुक्त हर्डीकर आजारी असल्याने महापालिकेच्या प्रश्नांसदर्भात बैठक झाली नाही. त्यानंतर गुरूवारी खासदार श्रीरंग बारणे यांनी हिंजवडी परिसरातील वाहतूक प्रश्नाबाबत पाहणी केली. हप्तेखोरीमुळे वाहतूककोडीत भर पडत आहे, अशी टीका करण्यात आली. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांच्यासमवेत चर्चा केली. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी हिंजवडी स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरी परिसरातील प्रलंबित कामांची पाहणी करून प्रशासनास सूचना केल्या.
भाजपा प्रवेशास पूर्णविराम
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदार संघांचा भाग येतो. मावळ आणि शिरूर मतदार संघात शिवसेनेचे खासदार आहेत. तर बारामती मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे हे भाजपात येणार असल्याच्या आवई उठविली जात आहे. या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भाजपा प्रवेशाचा इन्कार दोन्ही खासदार करीत आहेत. भाजपातील अस्वस्थ लोक ही आवई उठवित आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेची असून शिवसेना खासदारांविषयी विरोधकांकडून अफवा पसरविल्या जात आहेत. त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहे, शिवसेनेतच राहणार असल्याचे बारणे यांनी जाहिर केल्याने शिवसेना खासदारांच्या भाजपा प्रवेशास पूर्णविराम मिळाला आहे.