दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका 'ॲलर्ट'; ६५० रुग्णालयांना डिपॉझिट न घेण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:10 IST2025-04-09T18:09:16+5:302025-04-09T18:10:55+5:30
कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट रक्कम घेतल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल, महापालिकेचा रुग्णालयांना इशारा

दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका 'ॲलर्ट'; ६५० रुग्णालयांना डिपॉझिट न घेण्याच्या सूचना
पिंपरी चिंचवड : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर रुग्णालयाला समज देणार असल्याचे महिला आयोगाने सांगितले होते. तसेच रुग्णालय दोषी असून कारवाई होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
या सर्व प्रकाणानंतर गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉ घैसास यांनी राजीनामा दिला आहे. परंतु राज्य सरकारच्या अहवालानुसार त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. या सर्व प्रकरणात पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. दीनानाथ रुग्णालयातील प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका सजग झाली असून ६५० रुग्णालयांना अनामत रक्कम न घेण्याविषयी सूचना करण्यात आल्या आहेत. तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर पिंपरी महापालिकेने तब्बल 650 रुग्णालयांना नोटिसा पाठवल्या आहेत. कोणत्याच रुग्णांकडून ऍडव्हान्स घेऊ नका, असं घडल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल.असा इशारा पालिकेने या नोटीसीद्वारे रुग्णालयांना दिला आहे.
डॉ सुश्रुत घैसास यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून १० ते २० लाख मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. हॉस्पिटल प्रशासनाने त्याची कबुलीही दिली होती. त्याच्यानंतर गेल्या काही दिवसातील सामाजिक प्रक्षोभामुळे आपण अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत असे त्यांनी नमूद करत राजीनामा दिला. हॉस्पिटलच्या डिपॉझिट मागण्यावरूनच महिलेला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने अनामत रक्कम न घेण्याविषयी सूचना रुग्णालयांना दिल्या आहेत.