पिंपरी-चिंचवड महापालिका : कोणाच्या समजुतीसाठी अतिक्रमण कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 01:05 AM2018-12-26T01:05:28+5:302018-12-26T01:05:44+5:30
रहदारीस अडथळा ठरणाऱ्या, तसेच महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमणावर महापालिकेकडून कारवाई केली जाते. यासाठी महापालिकेची मोठी यंत्रणा वापरली जाते.
- मंगेश पांडे
पिंपरी : रहदारीस अडथळा ठरणाऱ्या, तसेच महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमणावर महापालिकेकडून कारवाई केली जाते. यासाठी महापालिकेची मोठी यंत्रणा वापरली जाते. मात्र, कारवाईसाठी आलेले पथक कारवाई करुन गेल्यानंतर पुन्हा काही तासांतच त्याच ठिकाणी अतिक्रमणे थाटलेली पाहायला मिळतात. त्यामुळे कारवाईचा देखावा कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामध्ये महापालिका अतिक्रमण धारकांची समजूत काढते की अतिक्रमणधारक महापालिकेची समजूत काढतात, हे अद्याप न उलगडणारे कोडे आहे.
अतिक्रमण रोखण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे. यासाठी अतिक्रमणविरोधी पथक स्थापन करण्यात आले असून, त्यांच्यामार्फत कारवाई केली जाते. पूर्वी प्रभाग कार्यालयनिहाय ही पथके स्थापन करून कारवाई केली जात होती.
आता मात्र, महापालिका मुख्यालयातून शहरातील अतिक्रमण कारवाईचे कामकाज पाहिले जात आहे. ज्या भागात कारवाई असेल त्या ठिकाणी मुख्यालयात पथक पाठविले जाते. कारवाई कितपत मोठी आहे, त्यानुसार पथकातील कर्मचाºयांची कुमक असते.
कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, किमान पंधरा मजूर, बुलडोझर, टेम्पो यासह कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. एका ठिकाणी कारवाई करण्यासाठी एवढी यंत्रणा वापरली जाते. मात्र, ज्या ठिकाणी कारवाई केली जाते, त्या ठिकाणी काही तासांतच पुन्हा अतिक्रमण थाटले जाते. त्यामुळे अतिक्रमण कारवाईचा खरेच उपयोग होतो का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अतिक्रमण कारवाई करण्यासाठी नेमलेल्या पथकात अधिकारी-कर्मचाºयांसह किमान ३० जणांचा समावेश असतो. यासह वाहनेही असतात. या कर्मचाºयांचे वेतन, तसेच वाहनभाडे अशाप्रकारे एका कारवाईसाठी किमान ५० ते ७० हजार रुपये खर्च येतो. यासह वेळही वाया जातो. मात्र, अतिक्रमणे पुन्हा थाटली जात असल्याने या कारवाईचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसून येते.
एखादी छोटी-मोठी कारवाई केल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून प्रसिद्धीसाठी प्रेसनोट काढली जाते. मोठी कारवाई केल्याचे चित्र निर्माण केले जाते. मात्र, कारवाईनंतर त्याच ठिकाणी अतिक्रमणे थाटली जात असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी कारवाईचा देखावा केला जातो का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
या ठिकाणची अतिक्रमणे ‘जैसे थे’
निगडीतील लोकमान्य टिळक चौकातील पदपथ व रस्ता अतिक्रमणाने व्यापला आहे. या ठिकाणी कधी तरी कारवाई केली जाते. त्या वेळी एक-दोन तासापुरते अथवा एका दिवसापुरते पदपथ मोकळे दिसतात. त्यानंतर मोकळे असलेले पदपथ अतिक्रमणाने व्यापले जातात. त्याचप्रमाणे १२ डिसेंबरला पिंपरीतील खराळवाडी येथून साई चौकाकडे जाणाºया रस्त्यालगतच्या टपºयांवर कारवाई करण्यात आली होती. आता या ठिकाणी पुन्हा टपºया थाटण्यात आल्याचे दिसून येत आहे.
राजकीय दबाव
अतिक्रमण कारवाईसाठी पथक आल्यानंतर अथवा कधी कधी तर संबंधित ठिकाणी जाण्यापूर्वीच पथकातील अधिकाºयांना राजकीय पदाधिकाºयांचे फोन येतात. ‘आपला कार्यकर्ता आहे, त्या ठिकाणी कारवाई करु नका’ असा आदेश सोडला जातो. त्यामुळे पथकातील अधिकाºयांचीही कोंडी होते.
पदपथ नेमके कोणासाठी?
बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी अशी पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल सुरू आहे. यामध्ये वाहतूक सुरळीत राहण्यासाठी शहरातील रस्तेही प्रशस्त करण्यात आले आहेत. अनेक चौक सिग्नल फ्री केले असून, ठिकठिकाणी उड्डाणपूल उभारले आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हे रस्तेही अपुरे पडत आहेत. अशातच या रस्त्यावर होत असलेली अतिक्रमणे रहदारीस अडथळा ठरण्यास अधिकच कारणीभूत ठरतात. रस्ते मोकळे राहण्यासह पादचाºयांसाठी पदपथही मोकळे राहणे आवश्यक असते.