सांगवीत अनधिकृत बांधकामावर पिंपरी चिंचवड महापालिकेचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 18:45 IST2018-01-04T18:43:44+5:302018-01-04T18:45:52+5:30
प्रभाग क्रमांक ३२ सांगवी मधूबन कॉलनी गल्ली क्रमांक १० येथील नव्याने सुरु असलेल्या एका पाच मजली आरसीसी ३५ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.

सांगवीत अनधिकृत बांधकामावर पिंपरी चिंचवड महापालिकेचा हातोडा
रहाटणी : पालिकेच्या बांधकाम परवानगी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ग व ह प्रभाग यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ३२ सांगवी मधूबन कॉलनी गल्ली क्रमांक १० येथील नव्याने सुरु असलेल्या एका पाच मजली आरसीसी ३५ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम असलेल्या इमारतीतील गुरुवारी सुमारे १० हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडण्यात आले. उर्वरित बांधकाम पाडण्याचे काम सुरू ठेवणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
काही काळ थंडावलेली पालिकेची अनधिकृत बांधकामावरील कारवाई पुन्हा एकदा जोमात सुरु झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिक धावाधाव करीत आहेत तर दुसरीकडे कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असल्याने नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत.
सांगवी येथील मधूबन कॉलनी येथे अनधिकृत नव्याने सुरू असलेली ३५ चौरस फुटाची पार्किंग व चार मजली इमारत आहे. त्यातील आज १० हजार चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. उर्वरित बांधकाम पाडण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे पालिकेच्या संबधित विभागाने सांगितले आहे
ही कारवाई करत असताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पोलिसा बरोबरच सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. अचानक सुरु झालेल्या कारवाईमुळे नागरिक भयभीत झाले.
ही कारवाई कार्यकारी अभियंता मनोज शेठीया यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम परवानगी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ग व ह यांच्या पथकानी केली.