PCMC: ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्काराने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 11:50 AM2023-12-08T11:50:28+5:302023-12-08T11:50:51+5:30

चीनमधील ग्वांगझू येथे सचिवालयात हा सन्मान सोहळा पार पडला....

Pimpri-Chinchwad Municipal Corporation honored with Guangzhou International Award | PCMC: ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्काराने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन्मान

PCMC: ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्काराने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन्मान

पिंपरी : महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘नवी दिशा’ उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवडला सन्मान पदकाने गौरविण्यात आले. चीनमधील ग्वांगझू येथे सचिवालयात हा सन्मान सोहळा पार पडला.

महापालिकेच्या समाजविकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे, समूह संघटिका वैशाली खरात आणि सीटीओच्या प्रज्ञा ठाकूर यांनी आयुक्तांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये ५४ देशांतील १९३ शहरांचा समावेश होता. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराने नावीन्यपूर्णता, परिणामकारकता आणि शाश्वत शहरी विकासासाठी असलेली वचनबद्धता दर्शविली. या स्पर्धेच्या नियमांचे मूल्यमापन करण्यासाठी दि. ११ ते १४ सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा समावेश असलेल्या तांत्रिक समितीने पिंपरी-चिंचवड शहराला भेट दिली होती.

अंतिम यादीत निवडलेली पंधरा शहरे

पिंपरी चिंचवड-भारत, अंतल्या-तुर्किये, बोगोटा-कोलंबिया, केपटाउन-दक्षिण आफ्रिका, ग्वांगजू-दक्षिण कोरिया, हलांद्री-ग्रीस, इज्तापालापा-मेक्सिको, जकार्ता-इंडोनेशिया, कंपाला-युगांडा, कझान-रशिया, मॅनहाइम-जर्मनी, रामल्लाह-पॅलेस्टाईन, साओ पाउलो-ब्राझील, तेहरान-इराण आणि क्सियानिंग-चीन या शहरांचा समावेश होता.

महापालिकेच्या वतीने नवी दिशा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून शहरातील सामुदायिक शौचालयांची देखभाल करण्याचे काम आर्थिक मोबदला देऊन महिला बचत गटांना देण्यात येत आहे. यामुळे महिलांना आर्थिक उत्पन्नाची संधी उपलब्ध झाली आहे. नागरी सहभाग आणि सहकार्यामुळे महापालिकेला मिळालेला हा बहुमान असून शहरवासीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका.

Web Title: Pimpri-Chinchwad Municipal Corporation honored with Guangzhou International Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.