पिंपरी चिंचवड मनपा, सर्वसाधारण सभा : वाहतनळ धोरणावर आज शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:26 AM2018-06-11T02:26:27+5:302018-06-11T02:26:27+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाहतनळ धोरण तयार केले आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हे धोरण सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी येणार आहे.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाहतनळ धोरण तयार केले आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हे धोरण सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी येणार आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेतील याबाबत उत्सुकता आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे एकवीस लाख असून, वाहनसंख्या सोळा लाख आहे. हे नागरिक विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात आपल्या वाहनाने ये-जा करीत असतात. हे करताना वाहनांचे पार्किं ग योग्य ठिकाणी करणे हा दिवसेंदिवस एक जटिल प्रश्न बनला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी स्मार्ट वाहतूक करण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वाहनतळाचे धोरण तयार केले आहे. त्यासाठी दिल्ली, चेन्नई, पुणे, मुंबई, बंगळुरू, नागपूर या शहराच्या पार्किं ग पॉलिसींचा अभ्यास केला आहे. त्याचे संगणकीय सादरीकरण महापालिका लोकप्रतिनिधींसमोर केले होते.
१ रस्त्यावरच्या निर्देशित वाहनतळांवर पिवळे पट्टे आखून ही जागा वाहनतळासाठी असल्याचे स्पष्ट केले जाईल. या पिवळ्या पट्टयाच्या आत वाहन उभे करणेही आवश्यक असणार आहे. सर्व वाहनतळांवर फलक लावणे बंधनकारक असेल.
२फलकांवर वाहनतळाचे दरपत्रक, वाहनतळाची क्षमता, कंत्राटदाराचे नाव व काही तक्रार करावयाची असल्यास तक्रारीसाठीचा दूरध्वनी क्रमांक इत्यादी तपशील असेल. सर्व वाहनतळांवर मासिक पासची सुविधा त्या-त्या वाहनतळांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
३ पार्किंग पॉलिसीत ‘अ’ (उच्च पार्किंग), ज्या ठिकाणी वाहन पार्क करण्याचे प्रमाण साठ ते ऐंशी टक्के आहे, असे ठिकाण झोन ‘ब’ (मध्यम पार्किंग), ज्या ठिकाणी चाळीस ते साठ टक्के पार्किंगचे प्रमाण आहे, असे ठिकाण झोन ‘क’ (कमी पार्किंग) आणि ज्या ठिकाणी वाहने पार्क करण्याचे प्रमाण चाळीस टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे ठिकाण झोन ‘ड’ (कमीत कमी पार्किंग) म्हणून घोषित केले जाणार आहे. सद्य:स्थितीत झोन ‘ड’ पार्किंग धोरणातून वगळले आहे.
४ गेल्या वीस वर्षांत वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांचे प्रमाणही वाढते आहे. सन २००१ मध्ये एक लाख ६४ हजार असणाºया दुचाकी आता बारा लाख आहे. चार चाकी वाहनांची संख्या २००१ मध्ये वीस हजार होती. ती आता अडीच लाखांवर पोहोचली आहे. २००१ मध्ये शहरात दुचाकी, चारचाकीसह सर्व प्रकारची दोन लाख दहा हजार वाहने होती. हा आकडा सोळा लाखांवर गेला आहे.
५ रस्त्यावरील पार्किंगसाठी झोन ‘अ’ मधील रस्त्यांकरिता एका मोटारीसाठी एक ईसीएसकरिता दहा रुपये प्रति तास आकारण्यात येणार आहेत. निवासी पार्किंगसाठी रात्री अकरा ते सकाळी आठ या वेळेसाठी पंचवीस रुपये प्रतिदिननुसार नऊ हजार तीनशे पंचवीस रुपयांचा वार्षिक परवाना देण्यात येणार आहे. त्यानुसार, पार्किंग दर ठरविण्यात आले आहेत. मात्र, सायकल, रुग्णवाहिका, दिव्यांगांची वाहने, मान्यताप्राप्त रिक्षा थांबे यांना शुल्कातून सवलत मिळणार आहे.
६पार्किंग धोरणात पार्किंगच्या जागांचे आणि वाहनांचेही वर्गीकरण करत दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. गावठाण भाग आणि झोपडपट्टींना यातून वगळले आहे. पार्किंग सुविधेचा वापर करण्यास नागरिकांना प्रवृत्त करण्यासाठी मासिक पास उपलब्ध करून देण्याची तरतूद धोरणामध्ये आहे. तर, सायकल, रुग्णवाहिका, दिव्यांगांची वाहने, मान्यताप्राप्त रिक्षा थांबे, यांना सशुल्क पार्किंगमधून सवलत देण्यात आली आहे. याबाबतच्या धोरणाला स्थायी समितीत मंजुरी दिली. त्यानंतर हे धोरण सर्वसाधारण सभेसमोर चर्चेला येणार आहे. पार्किंगचे मूळ दर हे वाहनाने व्यापणाºया जागेच्या प्रमाणात असतील.