पिंपरी चिंचवड महानगरपालिका; प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आज होणार सादर!
By विश्वास मोरे | Published: February 20, 2024 09:07 AM2024-02-20T09:07:47+5:302024-02-20T09:08:10+5:30
पिंपरीकरांना खुश करण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात काय योजना असणार, याविषयी उत्सुकता
पिंपरी: महापालिकेत प्रशासकीय राजवट लागून दोन वर्षे झाली आहेत. प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प मंगळवारी सकाळी ११ वाजता सादर होणार आहे. प्रशासक आणि शेखर सिंह यांच्या कारकिर्दीतील दुसरा अर्थसंकल्पातून त्यात नक्की दडलय काय? याची उत्सुकता शहरवासीयांना आहे.
पिंपरी- चिंचवड महापालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. लेखा विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेला अर्थसंकल्प हा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे सुपूर्द केला जाईल. त्यानंतर प्रशासक अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये सांगतील.
निवडणुकांचे वर्ष, सवलती विषयी उत्सुकता
पुढील वर्षभर लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुका आहेत. त्यामुळे शहरवासीयांना खुश करण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात काय योजना आहेत. याविषयी उत्सुकता आहे. मिळकत कर आणि पाणीपट्टी दरवाढ होणार नाही, हे आयुक्तांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र कर सवलत याविषयीची उत्सुकता आहे. लोकनियुक्त समिती नसल्याने नव्या योजना काय? उत्पन्न स्रोत वाढीवर उपाययोजना काय? याविषयी उत्सुकता आहे. सुमारे ७१८कोटी शिलकीचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला होता. यंदा शिलकीचा असेल की वाढीचा असेल? याविषयी उत्सुकता वाढली आहे.