पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभागरचनेचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 01:32 PM2022-07-12T13:32:52+5:302022-07-12T13:35:01+5:30
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांची सर्वोच्च न्यायालयात दाद...
पिंपरी : नियमाबाह्य आणि चुकीच्या पद्धतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना केल्याचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या याचिकेवर मंगळवारी (दि.१२) सुनावणी होणार आहे.
महापालिकेच्या प्रभागरचनेसंदर्भात गोंधळ आणि राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णय संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका आहे. या याचिकेमध्ये पिंपरी-चिंचवडचा अर्ज दाखल करून घेतला आहे. दरम्यान, प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध होण्यापूर्वी प्रभागाची मोडतोड होणार अशी तक्रार राज्यपाल आणि राज्य निवडणूक आयोग, भारत निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याची दखल न घेता त्या प्रमाणे प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली. राज्य निवडणूक आयोगाने कळविल्याप्रमाणे मुदतीत हरकत नोंदवून व सुनावणीत बाजू मांडल्यानंतर ठोस झाला नाही.
विलास मडिगेरी म्हणाले, ‘‘महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या चुकीच्या व नियमबाह्य कामकाजावर अनागोंदी कारभाराविरोधात लढा सुरू आहे. हा वाद आता देशातील सर्वोच्च न्यायसंस्थेपुढे पोहोचला आहे. नियमबाह्य चुकीच्या पद्धतीने प्रभागरचनेत फोडाफोडी करणे, गोपनीयतेच्या भंग करणे, राजकीय हस्तक्षेप होणे, आरक्षणाबाबत शहरातून आलेल्या २७५ हरकतींकडे दुर्लक्ष करणे, मतदार याद्या चुकीच्या पद्धतीने फोडल्याचे पुरावे सादर केले आहेत. याबाबतचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतला आहे. मंगळवारी सुनावणी होणार आहे.’’