पिंपरी-चिंचवड महापालिका विधवा आणि घटस्फोटीत महिलांना करणार सक्षम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 02:04 PM2022-06-09T14:04:34+5:302022-06-09T14:05:01+5:30
कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना मदत..
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिला वर्गाला सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जातात.शहरातील विधवा आणि घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केले जाणार आहे. कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना मदत करण्यात येणार आहे.
कशी होईल मदत
पूर्वी या योजनेद्वारे विधवा आणि घटस्फोटीत महिलांना १० हजार रुपये इतकी रक्कम अर्थसहाय्य म्हणून देण्यात येत होती. या योजनेत सुधारणा करण्यात आली आहे. विधवा आणि घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी महापालिकेच्या वतीने देण्यात येणाºया अर्थसहाय्यामध्ये आता वाढ केली आहे. महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाºया कौशल्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शहरातील महिलांना २५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तर असे प्रशिक्षण न घेतलेल्या महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी १५ हजार रुपये अर्थसहाय्य केले जाईल.
कोणती हवीत कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वी अर्जदाराला तहसीलदार यांच्याकडील २ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणारा दाखला अथवा २ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या रेशनकार्डची प्रत अनिवार्य होती परंतु आता यात बदल करण्यात आला असून यासाठी आता तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकारी यांचा २ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणारा दाखला अथवा प्राधान्य घरगुती शिधापत्रिका असणाºया महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
असा करता येईल अर्ज
अर्ज सादर करणाऱ्या विधवा आणि घटस्फोटीत महिलांनी महापालिका हद्दीतील आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. यासोबत मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादीची प्रत, घटस्फोटीता महिलांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत, विधवा स्त्रीयांना पतीच्या मृत्यूच्या दाखल्याची प्रत जोडावी लागेल. तसेच अर्जदार महिलेचे वय अर्ज केलेल्या दिनांकास ५० वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
महिलांना स्वयंरोजगारासाठी उत्तेजन देण्यासाठी तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करण्यासाठी महापालिकेच्या वतीने अटलबिहारी वाजपेयी विधवा आणि घटस्फोटीत महिलांना किरकोळ स्वरूपाचा घरगुती व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य योजनेची सुरुवात केली आहे.
- राजेश पाटील, आयुक्त