पिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे युवतींना मिळणार रोजगाराच्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 02:53 PM2019-12-27T14:53:54+5:302019-12-27T14:57:30+5:30
१८ ते ३० वयोगटातील युवक, युवतींना मोफत प्रशिक्षण
पिंपरी : महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीची सभा आज झाली. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ‘लाईट हाऊस’ प्रकल्प राबविण्याचा विषय मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत १८ ते ३० वयोगटातील युवक, युवतींना मोफत प्रशिक्षण देवून, रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यात येणार आहेत.
पुणे महानगरपालिकेत पुणे सिटी कनेक्ट डेव्हल्पमेंट फाऊंडेशनच्या वतीने ‘लाईट हाऊस’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रकल्प राबविण्यासाठी संस्थेने तयारी दर्शविली होती. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या समवेत चर्चा झाली होती. त्यानंतर महापालिकेने शहरातील जागांची पाहणी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्यात जुने ड क्षेत्रीय कार्यालय, पिंपरीगाव आणि झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाचे वरील पहिला मजल्यावरील हॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे. या संदर्भातील विषय आजच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेसमोर आला होता. अध्यक्षस्थानी निर्मला कुटे होत्या. लाईट हाऊस प्रकल्पाच्या विषयास मंजूरी देण्यात आली.
या अंतर्गत महापालिका क्षेत्रातील वय वर्षे १८ ते ३० या वयोगटातील महिला, मुले, मुली, शालाबाह्य विद्यार्थी यांच्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. प्रकल्पाचा खर्च सीएसआरच्या निधीमधून केला जाणार आहे. तसेच यासाठी स्वतंत्रपणे कर्मचारी वर्ग नियुक्त केला जाणार असून याबाबतची सर्व जबाबदारी ही संस्थेची असणार आहे. या उपक्रमाकरीता लोकसहभाग मिळवून देण्यासाठी तसेच लाभार्थी मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील समुहसंघटक उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
.........
४प्रशिक्षण दिलेल्या लाभार्थींपैकी पन्नास टक्के लाभार्थींना सहा महिन्यांत रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थेची असणार आहे. हे काम करण्यासाठी, प्रकल्प राबविण्यासाठी महापालिका आणि पुणे सिटी कनेक्ट डेव्हल्पमेंट फाऊंडेशन समवेत करार केला जाणार असून त्याविषयास महिला बालकल्याण समितीने मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रायोगिक तत्वावरील हा प्रकल्प एका भागात यशस्वी झाल्यास शहरातील अन्य भागात केला जाणार आहे, याबाबतही समितीने मंजूरी दिली आहे.