Pimpri chinchwad Breaking: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा तब्बल ७११२ कोटींचा अर्थसंकल्प 'स्थायी'पुढे सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 12:53 PM2021-02-18T12:53:53+5:302021-02-18T12:59:34+5:30
मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्प तयार केला आहे. अर्थसंकल्पावर त्यांची छाप आहे .
पिंपरी : औद्योगिक नगरी म्हणून नावलौकिक असलेल्यापिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०२१-२२या आर्थिक वर्षांचा मूळ ५ हजार ५८८ कोटी ७८ लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह ७ हजार ११२कोटी रुपयांचा अर्थसंकल्पआयुक्त राजेश पाटील यांनी गुरुवारी स्थायी समितीला सादर केला.
सभापती संतोष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, विकास ढाकणे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेचा हा ३१ वा अर्थसंकल्प आहे. तर, नवनिर्वाचित आयुक्त राजेश पाटील यांचा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाच्या अभ्यासाठी ही विशेष सभा २४ फेब्रुवारी पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्प तयार केला आहे. अर्थसंकल्पावर त्यांची छाप आहे. त्यांची शुक्रवारी (दि.12) पुण्यात नोंदणी महानिरीक्षकपदी बदली झाली. हर्डीकर प्रशासनाने तयार केलेला अर्थसंकल्प नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीला सादर केला.
सभा तहकूब करण्याची नामुष्की...
महापालिका अर्थसंकल्पाचे गांभीर्य सत्ताधारी भाजपला नसल्याचे दिसून आले असून स्थायी समितीची सभा एक तासांनी पुढे ढकलली आहे. पुरेशी गणसंख्या उपस्थित नसल्याने सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढवली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 2021-22 चा अर्थसंकल्प सादर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार होता. मात्र पाचच सदस्य उपस्थित असल्याने सभा कामकाज काही काळ तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर एक तासांनी आठ सदस्य आल्यानंतर सभा कामकाज सुरू झाले.
महापालिका सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. सभेला शिवसेना गटनेते राहुल कलाटे, भाजपच्या भामा फुगे आरती चोंधे, संतोष कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे पंकज भालेकर, पंकज भालेकर, राजेंद्र लांडगे उपस्थित होते.