पिंपरी- चिंचवड महापालिकेची कोरोनामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या ९ वारसांना प्रत्येकी २५ लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 09:08 PM2021-06-25T21:08:50+5:302021-06-25T21:11:15+5:30
पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने ९ मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आज धनादेश प्रदान..
पिंपरी : महापालिका सेवेतील कोरोनामुळे मयत झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांच्या दु:खात महानगरपालिका सहभागी आहे, असे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयाचे धनादेशाचे वाटप आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, पिंपरी चिंचवड शहर महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण विभागाच्या माया वाकडे आदी उपस्थित होत्या.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, ‘‘अचानक उद्भवलेल्या कोरोना विषाणु संसगार्मुळे देशात लाखो जणांचा मृत्यू झाला. महानगरपालिकेतील काही कर्मचारी बंधु भगिनींचा देखील कोरोनामुळे मृत्यु झालेला आहे. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी यांचे समवेत चर्चा करुन मयत महापालिका कर्मचा-यांच्या वारसास २५ लाख इतकी मदतीची रक्कम देण्याचा निर्णय झाला असे सांगुन महापौर माई ढोरे यांनी वारसांना मार्गदर्शन करताना, सदर रकमेचा मुलांचे शिक्षण व भविष्य घडविण्यासाठी रकमेचा वापर करावा असे सांगितले.
..............................
या वारसांना मिळाली मदत
महानगरपालिकेच्या वतीने ९ मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आज धनादेश प्रदान केले. यामध्ये अकबर सय्यद, वाहन चालक नागरवस्ती विकास योजना, रमेश जगताप, मुकादम ह क्षेत्रीय आरोग्य, राजेंद्र तुपे, सहाय्यक शिक्षक - माध्यमिक, काळुराम नलावडे, शिपाई झ्र बांधकाम परवानगी अनधिकृत बांधकाम, विनायक फापाळे, मुख्य लिपिक ड क्षेत्रीय कार्यालय, अलका साळवे, स्टाफनर्स वायसीएम रुग्णालय, मोहन डिगोळे, लिपिक नागरवस्ती विकास योजना, रामदास राखपसरे, सफाई कामगार ब क्षेत्रीय आरोग्य आणि पंडीत कुटे, प्लंबर क क्षेत्रीय आरोग्य यांच्या वारसांना महानगरपालिकेने धनादेश सुपुर्द केले.